विमा नूतनीकरणाअभावी ई-बस ठप्प
विमा नूतनीकरणाअभावी ई-बस ठप्प
डोंबिवलीत वातानुकूलित बस बंद
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ : कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन (केडीएमटी) विभागाच्या वातानुकूलित ई-बस विमा नूतनीकरण न झाल्यामुळे गेल्या २० दिवसांपासून बंद अवस्थेत उभ्या आहेत. परिणामी प्रवाशांना पुन्हा जुन्या बसचा आधार घ्यावा लागत आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये सेवेत दाखल झालेल्या या वातानुकूलित बसना चांगला प्रतिसाद मिळाला होता; मात्र आता विमाकवचाअभावी या बस रस्त्यावरून गायब झाल्या आहेत.
केंद्र सरकारच्या सूचनांनुसार पारंपरिक इंधनावरील वाहनांऐवजी विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याअंतर्गत महापालिकेने १५व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून २०७ ई-बस भाडेतत्त्वावर आणण्याचा निर्णय घेतला. यात पहिल्या टप्प्यात १०७ आणि दुसऱ्या टप्प्यात १०० बस कॉसिस कंपनीकडून पुरवण्यात येणार होत्या. नोव्हेंबर २०२३मध्ये पहिल्या टप्प्यातील काही बस दाखल झाल्या. मात्र उर्वरित बस अजूनही येणे बाकी आहेत. याच दरम्यान आधीच उपलब्ध असलेल्या बसचा विमा नूतनीकरण कंत्राटदाराकडून न केल्यामुळे त्यादेखील बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
केडीएमटीच्या वातानुकूलित बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. या बसमध्ये प्रवाशांची किती ही गर्दी असली तरी बस बंदिस्त व वातानुकूलित असल्याने प्रवासी या बसला सर्वाधिक पसंती देत होते; मात्र गेल्या २० दिवसांपासून सामान्य बस केडीएमटीकडून सोडण्यात येत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. ई-बस बंद झाल्याने प्रवाशांना पुन्हा जुन्या व अपुरी सोय असलेल्या बसचा वापर करावा लागत आहे. कोंदट वातावरण, उष्णता आणि पावसामुळे प्रवास त्रासदायक झाला आहे. काही प्रवासी वैतागून पुन्हा शेअर रिक्षा वापरू लागले आहेत.
प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
वातानुकूलित ई-बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र वर्ष होत नाही तोच यातील दोन बसमध्ये बिघाड झाला. एका बसचे रजिस्ट्रेशन न झाल्याने सात बस चालवण्याच्या स्थितीत होत्या. यातील चार ते पाच बस रस्त्यावर धावत होत्या.
काही दिवसांत विमा प्रक्रिया पूर्ण
ई-बसचे दरवर्षी नूतनीकरण होणे आवश्यक आहे. संबंधित कंत्राटदारास तसे सूचित केले आहे. काही दिवसांत विमा प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि बस पुन्हा सेवेत आणल्या जातील, अशी माहिती परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार द्वासे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.