रेल्वे रूळ ओलांडताना महिलेचा मृत्यू
रेल्वे रूळ ओलांडताना महिलेचा मृत्यू
वाचवायला गेलेल्या तरुणानेही जीव गमावला; अंबरनाथच्या मोरीवली गावाजवळ घटना
अंबरनाथ, २२ जुलै (वार्ताहर) : कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला, तर तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या सहकाऱ्याचाही यात दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना अंबरनाथजवळील मोरीवली गावाजवळ रविवारी (ता. २०) घडली असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मोरीवली गावातील वैशाली सुनील धोत्रे (वय ४५) या एमआयडीसीतील खासगी कंपनीत काम करत होत्या. त्यांच्यासोबत महालक्ष्मी नगरमधील आतिष रमेश आंबेकर (वय २९) हादेखील त्याच कंपनीत कार्यरत होता. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोघे कामावरून घरी जात होते. आतिष हा वैशाली यांना सोडण्यासाठी मोरीवली गावाजवळ बी केबीन रोडवर गेला होता. या वेळी वैशाली या कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रूळ ओलांडत असताना अचानक भरधाव रेल्वे जवळ आली. आतिष आणि इतर काही नागरिकांनी मोठ्याने आवाज देऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचं लक्ष नसल्यामुळे आतिष तिला वाचवण्यासाठी धावला आणि यात दोघांनाही धडक बसली. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.
घरचा आधार हरवला
आतिष हा आपल्या वृद्ध आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अशा अचानक मृत्यूनं संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दोन्ही बहिणींचे लग्न झाले असून, आतिषच घरचा आधार होता. दुसरीकडे वैशाली यांचा मुलगा २२ वर्षांचा असून, मुलीचं लग्न ठरवण्याच्या तयारीत कुटुंब व्यस्त होतं. त्यांच्या पती व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. वैशाली यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाच्या खांद्यावरचा एक मोठा आधार हरवला आहे.
रुळांवर वारंवार अपघात
मोरीवली गाव ते बी केबीन रोड या मार्गावर याआधीही अनेक अपघात झाले आहेत. नागरिक वेळ वाचवण्यासाठी धोकादायक पद्धतीने रूळ ओलांडतात आणि जीव धोक्यात घालतात. या पार्श्वभूमीवर पादचारी पूल व उड्डाणपूल उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. मोरीवली गावाचे माजी नगरसेवक नंदकुमार भागवत यांनी या मागणीचा पुनरुच्चार करत, “रेल्वे प्रशासन आणखी किती निष्पाप बळी गेल्यावर जागं होणार”, असा सवाल उपस्थित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.