‘मैदान गेले, बालपण गेले''
‘मैदान गेले, बालपण गेले!''
सानपाडाकरांची आर्त हाक
जुईनगर, ता. २२ (बातमीदार) : सानपाडा सेक्टर १० येथील कै. डी. व्ही. पाटील खेळाच्या मैदानातील आर्चरी खेळाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीकरिता मैदान वाचवा कृती समितीतर्फे मंगळवारी (ता. २२) मोर्चा काढला होता. या मोर्चात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्येकर्ते व स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला. यासंदर्भात लेखी निवेदन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना देण्यात आले. याआधी पालिका विभाग कार्यालय प्रवेशद्वारावर घोषणा देऊन ठिय्या देण्यात आला.
या मैदानात आर्चरी खेळाचे केंद्र विकसित करण्याकरिता नवी मुंबई महापालिकेतर्फे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र आर्चरी खेळापुरते हे मैदान मर्यादित होऊन पारंपरिक आणि सामान्य खेळ खेळता येणार नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. परिसरातील मुलांना खेळासाठी अथवा नागरिकांना विविध कार्यक्रमांसाठी मैदान उरणार नसल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे निविदा रद्द न झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
याप्रसंगी सोमनाथ वास्कर, पंकज चौधरी, बाबाजी इंदोरे, सुनील कुरकुटे, अविनाश जाधव राजेश ठाकूर, सुनिक भैसाने, गणपत भापकर, रणजी पाटील, गणेश पावगे, अजित सावंत, अजय पवार आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
आर्चरी खेळाला विरोध नाही, तर...
सानपाडा येथील सेक्टर १० आणि ११ येथील मुलांसाठी एकमेव असलेले हे मैदान आर्चरी खेळासाठी झाल्यास परिसरातील मुलांनी कुठे खेळायचे, असा संतप्त सवाल सानपाडाकर करीत आहेत. आर्चरी खेळाला येथील नागरिकांचा विरोध नसून निवडलेले मैदान सोडून इतर ठिकाणी पर्यायी जागा निवडण्याची विनंती येथील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.