मेट्रो कारशेडसाठी बळीराजाचा पुढाकार

मेट्रो कारशेडसाठी बळीराजाचा पुढाकार

Published on

भाईंदर, ता. २२ (बातमीदार) : डोंगरी गावातील प्रस्तावित कारशेडमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार असल्याने कारशेडला तीव्र विरोध होत आहे. हे कारशेड अन्यत्र स्थलांतर करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांची संस्था असलेल्या शेतकरी विकास मंडळाने खोपरा येथील आपल्या शेतजमिनी कारशेडसाठी देण्याची तयारी दाखवली आहे. या जमिनी सध्याच्या कारशेडच्या प्रस्तावित जागेला लागूनच आहेत. या जमिनींवर कारशेड स्थलांतर झाले तर पर्यावरणाचे रक्षण तर होणार आहेच, शिवाय कारशेड उभारणीच्या खर्चातही मोठी बचत होणार आहे.

सध्या डोंगरी गावातील डोंगरावर कारशेड उभारण्याचा एमएमआरडीएचा प्रस्ताव आहे, मात्र त्यासाठी तब्बल १२ हजार झाडांचा बळी द्यावा लगणार आहे आणि त्याला स्थानिकांसह पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध आहे. या वृक्षतोडीविरोधात स्थानिकांनी आंदोलन सुरू केले आहे. वृक्षतोडीविरोधात आंदोलनकर्त्यांनी सह्यांची मोहीम राबवली तसेच नुकतीच मानवी साखळी तयार करून आपला निषेध नोंदवला. डोंगरावर असलेली हजारो झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे, शिवाय त्या ठिकाणी असलेला पशुपक्ष्यांचा नैसर्गिक अधिवासही नष्ट होणार आहे.

एकाही झाडाची कत्तल नाही
सध्याचा मेट्रो मार्ग मूर्धा, राई गावांच्या मागील बाजूने प्रस्तावित असलेल्या रस्त्यावरून नेण्यात येणार आहे. हा रस्ता पुढे सागरी सेतूला जाऊन मिळणार आहे. शेतकरी मंडळाची सुमारे १०० एकर जमीन या रस्त्याला अगदी लागून आहे. शिवाय या जमिनीवर एकही झाडे नसून, जमीन पडीक आहे. त्यामुळे या ठिकाणी कारशेड स्थलांतर झाल्यास एकही झाड तोडावे लागणार नाही. त्यामुळे डोंगरी गावातील सध्याची प्रस्तावित वृक्षतोड होणार नाही व पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण होईल.

खर्चामध्ये मोठी बचत
कारशेडची जागा डोंगरावर असल्याने त्यासाठी मेट्रोचा मार्गही उंचावरून न्यावा लागणार आहे, तसेच डोंगराचे सपाटीकरणही करावे लागणार आहे. शिवाय वृक्षतोडीसाठी भरावे लागणारे शुल्क व वृक्षलागवडीसाठी एमएमआरडीएला मोठा खर्च सोसावा लागणार आहे; मात्र शेतकऱ्यांनी सुचविलेल्या जागेत कारशेड स्थलांतर झाले, तर या खर्चात मोठी बचत होणार आहे.

अधिकाऱ्यांची भेट
शेतकऱ्यांच्या जमिनी सपाट असून, त्या डोंगराच्या खाली आहेत. त्यामुळे एमएमआरडीएला कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या जागा डोंगरी व मोर्वा गावातील शेतकऱ्यांच्या आहेत. या जमिनी योग्य मोबदला मिळाला तर कारशेडसाठी देण्याची तयारी असल्याचा ठराव या शेतकऱ्यांची संस्था शेतकरी विकास मंडळाने केला आहे. या ठरावासह जागेची कागदपत्रे व नकाशे घेऊन शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच पर्यावरणप्रेमींनी नुकतीच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकदेखील उपस्थित होते.

सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना
शेतकऱ्यांनी कारशेडसाठी देऊ केलेली जागा योग्य असल्याने तसेच कारशेडसाठी वृक्षतोड करावी लागणार नसल्याने कारशेड स्थलांतर करण्याची सकारात्मक भूमिका सरनाईक यांनी दर्शविली. कारशेड शेतकरी विकास मंडळाच्या जमिनीवर स्थलांतर करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून तो मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवावा, अशा सूचना प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या. कारशेड स्थलांतराचा प्रस्ताव राज्य सरकारकडून स्वीकारण्यात आला, तर मेट्रो कारशेडच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com