गोकुळगाव आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची हेळसांड

गोकुळगाव आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची हेळसांड

Published on

गोकुळगाव आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची हेळसांड
मार्क्सवादी लेनीनवादी पक्षाचा आंदोलनाचा इशारा
किन्हवली, ता. २२ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील गोकुळगाव (आंबिवली) येथील आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार, आरोग्य आणि मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाच्या लाल बावटा संघटनेने बुधवारी (ता. २३) आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. संस्थेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी १६ जुलैला आश्रमशाळेची पाहणी केली होती.
गोकुळगाव-आंबिवली येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची पहिली ते दहावीपर्यंतच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आहे. मुले व मुली अशी मिळून ३५७ विद्यार्थी पटसंख्या आहे. या आश्रमशाळेबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर मार्क्सवादी लेनीनवादी पक्षाच्या शहापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी १६ जुलैला पाहणी केली. पाहणी दौऱ्यात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार व आरोग्य, शिक्षण व इतर सुख सुविधांबाबतीत खूप मोठी तफावात आढळली. कुजलेला भाजीपाला, अशुद्ध पाणी, अस्वच्छ स्नानगृहे, घाणीचे शौचालय, गरम पाण्याचा अभाव, लोंबकळलेल्या विद्युत तारा अशी दयनीय परिस्थिती पाहायला मिळाली.
या गंभीर परिस्थितीबद्दल लाल बावटा सचिव कॉ. भगवान मसणे, सहसचिव लक्ष्मण वाघ, कार्यकर्ते भूषण साबळे, समाधान हिलम, कॉम्रेड मधुकर वाघ यांनी संताप व्यक्त करत आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार आणि पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर बुधवारी (ता. २३) तीव्र आंदोलन करणार असल्याचे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.


घाणीचे साम्राज्य
स्नानगृह, शौचालय, स्वयंपाकगृह व काही वर्गखोल्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. पुरेसे पाणी नसल्याने शौचालय घाणीने भरलेली होती. इमारतीच्या परिसरात कचऱ्याचे ढीग पसरले होते.

आहार कुजलेला
अशुद्ध पिण्याचे पाणी, औषधे, कांदे मिरच्या, टोमॅटो, फ्लॉवर, बटाटे आदी भाज्या कुजलेल्या अवस्थेत जमिनीवर अस्ताव्यस्त पडल्या होत्या.

मुले आजारी
अनेक मुले थंडी, तापाने फणफणली होती. सर्दी खोकल्याने बेजार झाली होती. आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा नाही.


पाहणीत आढळलेल्या मुख्य तक्रारी
* मुलांना अशुद्ध पाणी
* कुजलेल्या भाज्या आणि अन्न साहित्य
* स्वयंपाकगृह व वर्गखोलीत अस्वच्छता
* स्नानासाठी गरम पाण्याचा अभाव
* विजेच्या लोंबकळलेल्या तारा, शौचालयात घाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com