जैवविविधता केंद्र पुन्हा फुलणार!
भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. २३ : मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील कानविंदे गावाच्या हद्दीत उभारण्यात आलेले उत्तमराव पाटील जैवविविधता केंद्र अनेक वर्षांपासून उपेक्षित अवस्थेत आहे. या केंद्राला लवकरच झळाळी मिळणार असून पुनरुज्जीवनासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी प्रस्ताव वनविभागाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव वनविभागाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. तो मंजूर झाल्यास निसर्गप्रेमींसाठी हे केंद्र पुन्हा एकदा आकर्षण ठरेल, अशी आशा आहे. सद्यस्थितीत १० वर्षांपासून केंद्राची देखभाल दुरुस्ती न केल्याने केंद्राला अवकळा आली आहे.
२०१६ मध्ये राज्य सरकारच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून या जैवविविधता केंद्राची उभारणी करण्यात आली होती. १२ राशी आणि नक्षत्रांवर आधारित नक्षत्रवने, स्थानिक वृक्ष प्रजातींची लागवड, पर्यटकांसाठी मनोरंजनाची साधने, तसेच वृक्षांचे शास्त्रीय महत्त्व सांगणारे पुस्तक संग्रहालय, इत्यादी कल्पना राबविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, उभारणीनंतर फारच कमी वेळात वनविभागाच्या अनास्थेमुळे केंद्राची दुरवस्था झाली. राज्य सरकारच्या सामाजिक वनीकरण विभागाने निर्धारित केलेल्या उद्देश आणि उद्दिष्टांच्या धर्तीवर या केंद्रात वनउद्यानाची निर्मिती करण्यात आली.
जैवविविधता व निसर्ग संरक्षणाची योजना राबविण्यात आली होती. मात्र, हे उद्यान वनविभागाच्या अनास्थेचे बळी ठरल्याने उभारणीच्या अंतिम टप्प्यात उद्देश आणि उद्दिष्टांप्रमाणे संरचना न झाल्याने त्याची आजच्या स्थितीत दुरवस्था झाली आहे. केंद्राची दुरुस्ती करून पर्यटकांसाठी खुले करण्याची मागणी दहा वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यानुसार खर्डी वनक्षेत्रपाल ल. म. चिखले यांनी या केंद्राच्या दुरुस्तीचा प्रस्ताव वनविभागाला दिला आहे. हा प्रस्ताव वनविभागाच्या विचाराधीन आहे. अंदाजे साडेतीन कोटी रुपयांच्या निधीच्या तरतूदीची मागणी करण्यात आली आहे. निधी उपलब्ध झाल्यास या केंद्राचे पुनरुज्जीवन करणे शक्य होईल. सरकारच्या अनास्थेचे बळी ठरलेले हे उद्यान पुन्हा एकदा दिमाखात उभे राहू शकणार आहे.
नक्षत्रवने
उद्यानात १२ राशींच्या पंचागकृती नक्षत्रवने साकारण्यात आले होते. पंचागातील राशी, नक्षत्र व चरणांच्या नावांचा यात समावेश होता. या इको फ्रेंडली उद्यानात स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून त्यांना १२ राशींची नावे देण्यात आली होती. नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि वृक्ष प्रजाती, वनस्पती आणि वन्यजीवांबद्धल आस्था निर्माण व्हावी, त्यांचे या नैसर्गिक गोष्टींकडे लक्ष वेधले जावे यासाठी या केंद्राची उभारणी करण्यात आली होती.
पर्यटकांसाठी सुविधा
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी क्रीडा, व्यायाम व मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्यात आली होती. वृक्ष, वेलींचे महत्त्व व त्यांची उपयोगिता सांगणारे पुस्तक संग्रहालय निर्माण करण्याचे त्याद्वारे माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्याचेही नियोजित होते.
८९ लाखांचे केंद्र ओसाड
२०१६मध्ये प्रत्येक जिल्ह्यात दोनप्रमाणे उत्तमराव पाटील जैवविविधता केंद्राची निर्मिती करण्याचे राज्य सरकारने सामाजिक वनीकरण विभागामार्फत निश्चित केले होते. ठाणे जिल्ह्यातील दोन केंद्रांपैकी एका केंद्राची उभारणी शहापूर तालुक्यातील कानविंदे गावाच्या हद्दीत १२ हेक्टर १० गुंठे जमिनीवर करण्यास सुरुवात केली होती. काही प्रमाणात त्याचे बांधकाम झाले. त्यासाठी एकूण ८९ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता; परंतु केंद्राची उभारणी अंतिम टप्प्यात असतानाच काम रखडले. अखेर हे केंद्र अडगळीत पडले आणि पर्यटकांनी त्याकडे पाठ फिरवली. वनविभागानेही देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने आजमितीस या केंद्राचा परिसर ओसाड बनला आहे.
अनास्थेची तब्बल दहा वर्षे
उत्तमराव पाटील जैवविविधता केंद्राला उतरती कळा लागली आहे. उपवनसंरक्षक कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात असलेले हे केंद्र सद्यस्थितीत खर्डी वनक्षेत्रपालांच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. तब्बल दहा वर्षे अनास्था सोसलेल्या या केंद्राची देखभाल, दुरुस्ती होण्याची गरज आहे. त्यामुळे त्याच्या पुर्नरचनेसाठी नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास केंद्राला पुन्हा झळाळी मिळू शकेल. अभ्यासनिय नैसर्गिक बाबींसाठी पर्यटक, शाळांचे विद्यार्थी व शिक्षक समूह यांनी येथे भेटी दिल्यास हे निसर्ग केंद्र पुन्हा चर्चेत येईल, असे वनक्षेत्रपाल लक्ष्मण चिखले यांनी सांगितले.
----------------------------
निधीचा हिशोब
वर्ष खर्च (लाखांत)
२०१६ १३.३१
२०१७ १५.७२
२०१८ ७.८७
२०१९ ५२.९९
एकूण ८९.८९
शहापूर : वनविभागाच्या अनास्थेपायी उत्तमराव पाटील जैवविविधता केंद्र ओसाड बनले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.