नवी मुंबई शहर खड्ड्यात
कोट्यवधींचा खर्च खड्ड्यांत
सीबीडी ते ऐरोलीपर्यंत रस्त्यांची चाळण; आरोग्याच्या व्याधींनी चालकांसह नागरिक त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ ः मोठ्या आणि नियोजित रस्त्यांकरिता नावाजल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात सर्वत्र खड्डेमय स्थिती झाली आहे. विशेष म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांमध्ये महापालिकेने रस्ते गुळगुळीत करण्याच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी केली आहे. तरीसुद्धा पावसाळ्यातील अवघ्या दीड महिन्यांमध्येच सीबीडी ते ऐरोलीपर्यंतच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. वारंवार खड्ड्यातून वाहने चालवावी लागत असल्याने महापालिकेचा करदाता असणाऱ्या नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत सुमारे ५०५ किलोमीटर अंतराचे अंतर्गत रस्त्यांचे जाळे आहे. सिडको काळात शहरात रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून आता या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकेतर्फे केले जाते. नवी मुंबईचे रस्ते मोठे, सुटसुटीत आणि मोकळे असल्यामुळे या रस्त्यांचे मुंबईतील लोकांना नेहमी कुतूहल असे, परंतु दोन वर्षांमध्ये नवी मुंबईच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. अंतर्गत भागातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. नेरूळमध्ये अपोलो रुग्णालयाहून अग्निशमन दलाच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही बाजूच्या मार्गिकांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. पाम बीच मार्गाहून सीवूड्स सेक्टर-५० चा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. नागरिक, वाहनचालकांना या खड्ड्यांंतून वाट काढावी लागत आहे. रस्त्यांवर महापालिकेने प्रत्येक नोडनिहाय कंत्राटदार नियुक्त केले आहेत. कंत्राटदारांमार्फत कोट्यवधींची निविदा वर्षाला महापालिका खैरातीप्रमाणे वाटत आहे, परंतु तरीही रस्त्यांवर पडलेले खड्डे म्हणजे नवी मुंबई महापालिकेच्या तिजोरीची दिवसाढवळ्या लूट अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून उमटत आहे. याप्रकरणी शहर अभियंते शिरीष आरदवाड यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
आयुक्त हे खड्डे पाहा
नेरूळ सेक्टर-४४ चा रस्ता, सीवूड्स सेक्टर-४८ मधील रस्ते, जुईनगरमध्ये गणेश देवळाकडे जाणारा रस्ता, सानपाडा रेल्वेस्थानक आणि सानपाडा छत्रपती संभाजी महाराज चौक, वाशी सेक्टर-१४ हा रस्ता सर्वात गजबजलेला असतो. हा रस्ता खड्डेमय झाला आहे. वाशी प्लाझा, बोनकोडे गाव, कोपरखैरणे सेक्टर-१९ बी, घणसोली दत्तनगर आणि घणसोलीतील विठ्ठल मंदिर, ऐरोली सेक्टर-१६ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य आहे.
रस्त्यावर उतरून पाहणी करा
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त विविध नोडमध्ये जाऊन विकासकामांची माहिती घेतात. या माहितीच्या बाबतीत आढावा घेतात, मात्र रस्त्यांची पाहणी करण्याची सवड आयुक्तांना मिळालेली नाही. शहरात खड्डे पडलेल्या रस्त्यांची वाईट अवस्था आहे, परंतु या रस्त्यांची तत्काळ पाहणी करून सूचना दिल्या, तर नवी मुंबईच्या नागरिकांना गुळगुळीत रस्ते मिळतील, अशी नागरिकांमधून प्रतिक्रिया उमटत आहे.
नवी मुंबई महापालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वी काही महिने आधी रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामावर कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. तरीदेखील हे रस्ते भरपावसाळ्यात उखडल्याने घाणेरड्या दर्जाचे रस्ते तयार केल्याचे समोर येत आहे. रस्त्यांवर होणारा खर्च अधिकाऱ्यांच्या खिशातील नसून नागरिकांनी महापालिकेला दिलेल्या करातील आहे. रस्त्यांच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार महापालिकेत दरवर्षी होतो. अशा प्रकरणांची चौकशी व्हायला हवी.
- सुधीर दाणी, सजग नागरिक मंच, प्रवर्तक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.