स्टॉलधारकांचा आक्रोश : रेल्वे दरनिर्धारणावरून वाद
रेल्वेच्या दरपत्रकावरून आक्रोश
तोटा होत असल्याचा स्टॉलधारकांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवरील खाद्यपदार्थांचे नवे दर प्रशासनाने जाहीर केल्यानंतर स्टॉलधारकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. नव्या दरामुळे सेवा देताना तोटा सहन करावा लागत असून, प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ देणे अशक्य असल्याचे म्हणत स्टॉलधारकांनी पश्चिम रेल्वेला पत्र पाठवले आहे.
रेल्वे प्रशासनाने नुकत्याच लागू केलेल्या दरानुसार, लिंबूपाणी, कोकम सरबत इत्यादी शीतपेयांचे प्रमाण २०० मिलीवरून १५० मिली करण्यात आले आहे. चार दशकांपासून वापरात असलेल्या प्रमाणात अचानक कपात केल्याने ग्राहकांमध्येही नाराजी आहे. रेल्वेस्थानकाबाहेर पदपथावरील विक्रेत्यांकडे त्याच किमतीत अधिक प्रमाणात पेय मिळत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. मिल्कशेक, ताक इत्यादी दुग्धजन्य पेयांवर बंदी घालून त्याऐवजी महागडी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. परिणामी प्रवाशांचा खर्च तर वाढलाच, शिवाय स्टॉलधारकांच्या व्यवसायावरही विपरीत परिणाम होत आहे.
---
महागाईकडे दुर्लक्ष
खाद्यपदार्थांमध्येही अनेक पदार्थांची दरवाढ केली आहे किंवा फेरविचार न करता दर निश्चित करण्यात आले आहेत. ठेपला, खाखरा, रगडा-पाव, इत्यादी लोकप्रिय पदार्थांचे दर जुनेच ठेवले आहेत. कच्चा माल आणि साहित्य खर्चात झालेली महागाई पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप स्टॉलधारक संघटनेने केला आहे.
----
दर पुनर्रचित करण्यात यावे!
रेल्वेस्थानकांवरील स्टॉल्सकडून पंचतारांकित हॉटेलसारख्या सेवेची अपेक्षा ठेवली जात आहे; मात्र वस्तूंचे दर बाहेरील विक्रेत्यांपेक्षा कमी ठेवले आहेत. बाजारातील वस्तुस्थिती लक्षात न घेता दर निश्चित केले गेले असून, यावर तातडीने उपाययोजना करावी. ग्राहक आणि स्टॉलधारकांचा विचार करून रेल्वे प्रशासनाने दर पुनर्रचित करावे, अशी मागणी पश्चिम रेल्वे कॅटरर्स असोसिएशनने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.