समुदेशनाअभावी ६२ विद्यार्थ्यांचा बळी
तीन वर्षांत ६२ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
समुदेशन सुविधेसाठी भारूकाकांचे बेमुदत उपोषण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : परीक्षेतील अपयश, पालकांच्या अपेक्षांचे ओझे अशा विविध मानसिक दबावातून मागील तीन वर्षांत राज्यात ६२ शालेय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शिक्षण विभागाकडून पालक आणि विद्यार्थ्यांना योग्य समुपदेशन व मार्गदर्शन मिळत नसल्याने ही वेळ आली आहे. याविरोधात व्यवस्थापन कार्यकर्ते महेंद्र बैसाणे (भारूकाका) यांनी कल्याणच्या चिकणघर येथे सोमवारपासून (ता. २१) बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सरकारने आपल्या मागण्यांचा तत्काळ विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राज्यात दरवर्षी दहावी-बारावीच्या परीक्षांना सुमारे २९ लाखांहून अधिक विद्यार्थी बसतात. त्यापैकी काही विद्यार्थी परीक्षेतील अपयश, अपेक्षित गुण न मिळणे, पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे मानसिक दबावाला बळी पडतात. त्यांना योग्यवेळी समुपदेशन न मिळाल्याने ते आत्महत्येसारखे पाऊल उचलतात. मागील तीन वर्षांत राज्यात सुमारे ६२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. यासाठी जबाबदार असलेल्या शिक्षण संचालकांपासून ते शिक्षण सचिवांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसह पालक, विद्यार्थ्यांना समुपदेशन मिळत नसल्याच्या विरोधात उपोषण करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, स्थानिक पोलिस ठाण्याकडे परवागनी मागितली; मात्र आपल्या मागणीची दखल न घेतल्याने आपण चिकणघर येथेच बेमुदत उपोषण सुरू केल्याचे भारूकाका यांनी सांगितले.
दरम्यान, भारूकाका यांनी विद्यार्थ्यांच्या समुदेशनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आत्महत्या, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याच्या मागणीसाठी मागील दोन वर्षांपासून आंदोलन, उपोषण इत्यादी करून सरकारचे लक्ष वेधले आहे.
--
परीक्षा काळात तात्पुरत्या योजना
शालेय विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे प्रभावी धोरणच नाही. परीक्षेच्या काळात केवळ तात्पुरत्या आणि ताळमेळ नसलेल्या समुपदेशकांवर विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची जबाबदारी सोपविली जाते. विद्यार्थ्यांसोबत पालकांपर्यंत समुपदेशन पोहोचतच नाही, असे भारूकाका म्हणाले.
--
यंत्रणेचा अभाव
एससीईआरटी आणि शिक्षण विभागाकडून समुपदेशकांच्या ३५७ जणांची यादी जाहीर केली जाते; मात्र त्यातील अनेक जण उपलबध होत नाहीत. शिवाय केवळ परीक्षांच्या काळातच हे समुपदेशन असते. त्यापूर्वी आणि त्यानंतरच्या काळात विद्यार्थ्यांवर आलेले मानसिक दडपण, त्यांच्यावरील दबाव तपासण्यासाठी शिक्षण विभागाकडे कोणतीच यंत्रणा नाही, असाही आरोप त्यांनी केला.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.