ठाणे रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण रखडले
ठाणे स्थानकाचे आधुनिकीकरण रखडले
खासदार म्हस्केंनी संसदेचे लक्ष वेधले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ ः भविष्यात हेलिकॉप्टरही उतरेल अशा पद्धतीने ऐतिहासिक ठाणे स्थानकाचा कायापालट करण्यात येईल, असे स्वप्न दाखवण्यात आले. त्यासाठी अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत ठाणे रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणाचा ९४९ कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला; मात्र अजूनही हा प्रस्ताव प्रलंबित असल्याने ठाणे स्थानकाचे आधुनिकीकरण रखडले आहे. याकडे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
मध्य रेल्वेच्या उपनगरी सेवेतील महत्त्वाचे स्थानक म्हणजे ठाणे होय. रोज सात लाखांपेक्षाही अधिक प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात; मात्र त्या तुलनेत स्थानकात सोयीसुविधा नाहीत. सध्याची गर्दी आणि भविष्यातील गर्दी लक्षात घेऊन या स्थानकाचा कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ कायापालट नव्हे, तर हे स्थानक अत्याधुनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये १७ सरकते जिने, २० लिफ्ट, तीन ट्रॅव्हलेटर या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्व फलाट समाविष्ट होतील असा ५५ हजार चौरस मीटरचा डेक उभारण्यात येणार आहे. या डेकवर बस, रिक्षा थांबा, पार्किंग, फूड स्टॉल, छोटा दवाखाना, शौचालय आदी सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहेत. याशिवाय स्थानकाच्या हद्दीत बिझनेस प्लाझा उभारून त्यावर आपत्ती काळात गरज भासल्यास हॅलिकॉप्टर उतरेल, अशी व्यवस्थाही करण्याचे नियोजन आहे. हायटेक असलेल्या या प्रकल्पासाठी अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत मध्य रेल्वेने ९४९ कोटी रुपयांचा अंदाजे खर्चाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे, मात्र हा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली आहे. ठाणे हे देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे आणि त्याचे आधुनिकीकरण करण्याची नितांत आवश्यकता असल्याकडे त्यांनी या वेळी लक्ष वेधले आहे.
...
मुलुंड दिशेकडे हवा नवीन पूल
ठाणे स्थानकावर मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल तातडीने बांधण्याची आवश्यकता आहे. हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक एकला प्लॅटफॉर्म क्रमांक सात आणि आठशी जोडेल, तसेच स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंना जोडेल, ज्यामुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यात आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मोठी मदत होईल, असे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत सांगितले.
...
रेल्वेमंत्र्यांकडे निर्देशाची विनंती
रेल्वेमंत्र्यांनी या दोन्ही सार्वजनिक महत्त्वाच्या प्रस्तावांकडे वैयक्तिक लक्ष द्यावे आणि रेल्वे बोर्डाला लवकरात लवकर ते मंजूर करण्याचे निर्देश द्यावेत. जेणेकरून ठाण्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल आणि त्यांचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होईल, अशी विनंती खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.