मुंबई विभागात अकरावी प्रवेशात वाणिज्य शाखेकडेच सर्वाधिक कल
मुंबईत वाणिज्य शाखेकडे सर्वाधिक कल
कला शाखेला विद्यार्थ्यांची कमी पसंती, शेकडो जागा रिक्त राहणार
मुंबई, ता. २२ : मुंबई विभागात येणाऱ्या ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल वाणिज्य शाखेकडे दिसून आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या अकरावीच्या दोन्ही प्रवेश फेऱ्यांमध्ये वाणिज्य शाखेच्या उपलब्ध दोन लाख ३३ हजार ५७० जागांपैकी २८ हजार ५७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, तर कला शाखेच्या उपलब्ध ७३ हजार ८७५ जागांपैकी केवळ सहा हजार १७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. दोन्ही प्रवेश फेऱ्यांत कला शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात मंदावली असल्याचे दिसून आले आहे.
मुंबईत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी एकूण चार लाख ७१ हजार ७८० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ५६ हजार सहा जागांवर आतापर्यंत प्रवेश झाले आहेत. यात विज्ञान शाखेच्या उपलब्ध असलेल्या एक लाख ६४ हजार ३३५ जागांपैकी २१ हजार २५७ जागांवर प्रवेश झाले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य आणि विज्ञान शाखेकडे अधिक वाढला असून, कला शाखेकडे कमी झाल्याने अकरावीच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये प्रवेश कमी झाले आहेत.
मुंबई विभागापैकी एकट्या मुंबईत कला शाखेच्या एकूण २० हजार २७० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी केवळ दोन हजार ६५९ जागांवरच प्रवेश, तर उर्वरित १७ हजार ६११ जागा रिक्त आहेत. ह्या तिन्ही शाखांतील सर्व रिक्त जागा आता तिसऱ्या फेरीच्या प्रवेशासाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत.