ताऊली पर्वतावर चार पर्यटक भरकटले
‘ताहुली’वर चार पर्यटक भरकटले
मोबाईल टॉर्चच्या उजेडात पोलिसांनी घेतला शोध
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ ः पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात ट्रेकिंगचे, भटकंतीचे वेध लागतात. कल्याणजवळील श्री मलंगपट्ट्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या ताहुली पर्वतावर पर्यटक दरवर्षी येतात; मात्र पर्वतावरील वाटा माहीत नसल्याने ते मार्ग चुकून भरकटतात. मंगळवारी (ता. २२) मुंबईतील चार पर्यटक असेच फिरण्यासाठी ताहुली डोंगरावर गेले आणि वाट चुकल्याने हरवले. त्यांनी तत्काळ ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या ११२ या हेल्पलाइनवर संपर्क साधून माहिती दिली. हिललाइन पोलिसांनी याची माहिती मिळताच नेवाळी बिट चौकीतील पथकाने क्षणाचाही विलंब न लावता पर्यटकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या पथकाने अवघ्या पाच तासांत मोबाईल टॉर्चच्या साहाय्याने या चौघांचा शोध घेत त्यांची सुखरूप सुटका केली.
ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगड भागातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात; मात्र परिसराची माहिती पर्यटकांना नसल्याने अनेकजण अडकून पडतात. मंगळवारी मुंबईच्या दादर परिसरातील चार तरुण ताहुली पर्वतावर भटकंतीसाठी आले होते. सकाळी ते ताहुली पर्वतावर गेले असता घनदाट जंगलात वाट चुकले, परतीचा मार्गदेखील सापडत नसल्याने चौघे घाबरले; मात्र त्यांनी तत्काळ ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या ११२ नंबरवर संपर्क साधत पोलिसांकडे मदत मागितली.
पोलिसांना याची माहिती मिळताच हिललाइन पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. हिललाइन पोलिसांनी नेवाळी बिट चौकीतील पोलिस पथकाला याची माहिती दिली. हिललाइन पोलिसांकडून शोध संपर्क सुरू करण्यात आला होता. दरम्यान, घाबरलेल्या पर्यटकांचा फोन खोल दरीत पडल्याने त्यांच्याशी संपर्क साधणेदेखील पोलिसांना अवघड झाले होते. हिललाइन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अंकुश सुरेवाड, पोलिस हवालदार संदीप मुसळे, नाईक प्रशांत पाटील यांनी सुमारे पाचपेक्षा अधिक तास पर्वतावर शोधमोहीम घेतली. मोबाईल टॉर्चच्या उजेडात चौघांचा शोध घेतला जात होता; अखेर त्यांचा शोध पोलिसांना लागला. पोलिसांनी सायंकाळी चौघांना सुरक्षितरीत्या खाली उतरवत स्थानिक पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
चित्रा वाघ यांनी केले पोलिसांचे कौतुक
ठाणे पोलिस आयुक्तालयातील पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोधमोहीम हाती घेत चौघांना वाचवल्याबद्दल भाजप आमदार चित्रा वाघ यांनी पोलिसांच्या पथकाचे कौतुक केले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेल्या या डोंगराळ भागात बिबट्यासह अन्य जंगली प्राण्यांची वर्दळ आहे. त्यामुळे परिसरात स्थानिकांकडून पर्यटकांना सतर्क राहण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या जातात; मात्र काही उत्साही पर्यटक स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत बिनधास्त जंगलाची वाट धरून नंतर जंगलात अडकून बसत असल्याचे चित्र समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.