थोडक्यात बातम्या रायगड
को. ए. सो. दगडूशेठ पार्टे इंग्रजी माध्यम विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
महाड, ता. २३ (बातमीदार) : येथील को. ए. सो. दगडूशेठ पार्टे इंग्रजी माध्यम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वरद विजय जाधव याने राष्ट्रीय ग्रामीण स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर सई राहुल चालक हिने महाड तालुक्यात प्रथम व जिल्हास्तरावर सहावा क्रमांक पटकावला असून स्वयम सतेरे जिल्हास्तरावर ७० तर स्वरा शिर्के हिने ७१ वा क्रमांक मिळवला आहे. को.ए. सो. चे संचालक दिलीप पार्टे, शाळेच्या चेअरमन अनिता पार्टे, शाळा समितीचे सर्व सदस्य, तसेच मुख्याध्यापिका छाया भूतकर व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
................
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून पोलिसांना बॅरिकेड्सची मदत
कर्जत (बातमीदार) ः डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने कर्जत शहरातील वाहतूक व्यवस्थापनात मदतीचा हात पुढे पोलिस ठाण्यास १०० बॅरिकेड्स सुपूर्त करण्यात आले. हा बॅरिकेड्स वाटप सोहळा बुधवार, २३ जुलै रोजी विठ्ठल मंदिर संस्थान सभागृह, दहिवली येथे पार पडला. या कार्यक्रमाला कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले, कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे, सहाय्यक महिला पोलिस निरीक्षक मनिषा लटपटे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे कर्जत पोलिस विभागास १०० बॅरिकेड्स अधिकृतपणे देण्यात आले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर देशविदेशातही प्रसिद्ध आहे. अध्यात्मिक मार्गदर्शनासोबतच पर्यावरण रक्षण, स्वच्छता मोहिमा, आरोग्य शिबिरे, आणि वाहतूक नियमनासाठी मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांतून प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत असते. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचे प्रमुख आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक भोसले यांनी पोलिस ठाण्याच्या वतीने नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाने मानपत्र देऊन सन्मानीत केले. यावेळी प्रतिष्ठानचे श्री सदस्य भगवान भोसले, श्रीधर बुंधाटे, अशोक भागित, विनोद येवले यांनी प्रतिष्ठानच्या वतीने स्वीकार केला.
......................
आगरी आध्यात्म परिषदेच्या नियोजनाची बैठक उत्साहात
पेण (बातमीदार) ः येत्या पावसाळ्यानंतर होणाऱ्या आगरी अध्यात्म परिषदेसाठी रविवारी पेण येथे आयोजित नियोजन बैठक उत्साहात पार पडली. भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली ही परिषद संपूर्ण देशभरातील साधू-संतांच्या उपस्थितीत पेणमध्ये होणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी हे संमेलन ऐतिहासिक व संस्मरणीय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
...............
निलेश थोरे यांची भाजप दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड
माणगाव (बातमीदार) ः निलेश कुंडलिक थोरे यांची पुन्हा एकदा भाजप दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र देण्यात आले. थोरे यांनी मागील कार्यकाळात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि क्रीडा उपक्रमांतून उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
.................
दहावीचे वर्ग मित्र, आले ३० वर्षांनी एकत्र
माणगाव (बातमीदार) ः विघवली हायस्कूलच्या १९९५-९६ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला स्नेहमेळावा २० जुलै रोजी उत्साहात पार पडला. तब्बल ३० वर्षांनंतर शाळेतील मित्र पुन्हा एकत्र येऊन आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाला माजी शिक्षक, आजी-माजी मुख्याध्यापक, आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष महादेव बक्कम, माजी मुख्याध्यापक मोहिते, दांडेकर, कारंडे , जाधव तसेच हायस्कूलचे आजी मुख्याध्यापक उभारे त्याचबरोबर त्यांचे सहकारी शिक्षक पानवकर उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी शाळेच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले. अनेक माजी विद्यार्थी भावुक झाले. अशाप्रकारे अतिशय खेळामेळीच्या वातावरणात स्नेहमेळावा पार पडला.
...............
खोपोलीतील ज्येष्ठ नागरिक परशुराम पाटणकर यांचे निधन
खोपोली (बातमीदार) ः शहरातील वरची खोपोली भागातील ज्येष्ठ नागरिक परशुराम गंगाधर पाटणकर (वय ८७) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे, पंतवंडे असा मोठा परिवार आहे. खोपोलीमध्ये नैसर्गिक योग साधनासाठीचा आनंदाश्रम उभारण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले होते.
...........
मतदान यंत्र तपासणी कार्यक्रम सुरू
अलिबाग (वार्ताहर) ः जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी मतदान यंत्रांतील बर्न मेमरी तपासणी व पडताळणी कार्यक्रम सुरू झाला आहे. हा कार्यक्रम २१ जुलैपासून सुरू झाला असून २३ जुलैपर्यंत तीन दिवस चालणार आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीमध्ये ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पेणमधील रायगड जिल्हा मध्यवर्ती मतदान यंत्र वेअरहाऊस येथे ही संपूर्ण प्रक्रिया व्हिडीओ चित्रिकरणाद्वारे सुरू आहे. दररोज सकाळी १० ते संध्याकाळी सात या वेळेत ही तपासणी केली जात आहे. या प्रक्रियेमध्ये १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातील ५ मतदान केंद्रावरील आणि १९२ अलिबाग विधानसभा मतदारसंघातील ४ मतदान केंद्रावरील निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन्सच्या बर्न मेमरीची पडताळणी सर्व संबंधित निवडणूक उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बेल कंपनीचे अभियंता यांच्या मार्फत केली जात आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही प्रक्रिया पार पाडली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.