अलिबागमध्ये ''अमृत'' चे मध्यवर्ती कार्यालय
अलिबागमध्ये ‘अमृत’चे मध्यवर्ती कार्यालय
अलिबाग, ता. २३ (वार्ताहर) ः महाराष्ट्र शासन अंगीकृत ‘महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रबोधिनी अर्थात, ‘अमृत’ ही खुल्या प्रवर्गातील समाजघटकांच्या सर्वांगीण उत्कर्षांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेचे रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयीन इमारतीत लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ‘अमृत’चे रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे यांनी दिली आहे.
याविषयी ते म्हणाले, अमृत संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीराम बेंडे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान अलिबागला आले असता, त्यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेतली. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के आणि तहसीलदार महसूल (चिटणीस) चंद्रसेन पवार यांचीही त्यांनी भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी ‘अमृत’चे रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय अलिबागमध्ये सुरू करण्यासह संस्थेच्या कार्यासंदर्भात विस्तृत चर्चा केली. तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र प्रकल्प अधिकारी आनंद विद्यागर, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक जी. एस. हरळय्या, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांचीही भेट घेऊन अमृत संस्थेच्या विविध योजनांच्या संदर्भात विस्तृत चर्चा केली. त्याचबरोबर माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनाही भेटून अमृत संस्थेच्या वेळोवेळी सुरू होणाऱ्या योजनांचा प्रचार-प्रसार-प्रसिद्धी याविषयी सहकार्य देण्यासंदर्भात मागणी केली. संस्थेच्या विविध योजनांमुळे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मोलाची मदत होणार आहे. अमृतमधील विविध उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी खुल्या प्रवर्गातील समाजघटकांनी अलिबाग येथील मध्यवर्ती कार्यालय अथवा शैलेश मराठे यांच्याशी (९११२२२८७५९) संपर्क करा अथवा अधिक माहितीसाठी या वेबसाईटला (www.mahaamrut.org.in) भेट द्या, असे आवाहन करण्यात आले आहे.
................
महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम
अमृत संस्थेच्या योजनेत, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील व्यक्तींना विविध प्रकारची मदत दिली जाते. त्याचप्रमाणे विविध व्यवसायांचे शिक्षण तसेच स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन दिले जाते. विविध शासकीय योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ मिळवण्यासाठीची आवश्यक ती मदत केली जाते. या वर्गातील होतकरू व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण तसेच आर्थिक सहाय्य आणि कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. पात्र उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठीही कार्यक्रम राबवले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.