दर्याच्या राजाची लगबग सुरू
वसई, ता. २३ (बातमीदार) : पावसाळी मासेमारीबंदीचा कालावधी संपुष्टात येण्यासाठी अवघा आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे. बोटींना प्रशासनाने परवाने दिल्यावर मासेमारीसाठी मच्छीमार खोल समुद्रात जाणार आहेत. या अगोदर प्रवासात लागणारे साहित्य, बोटींची दुरुस्ती व अन्य कामे आटोपली जात असल्याचे दिसून येत आहे.
मासेमारीबंदीच्या दरम्यान मच्छीमार बांधव कुटुंब, मित्रमंडळींसोबत देवदर्शनाला गेले होते. काही जण वेलंकनी मातेचे दर्शन घेऊन परतले आहेत. आता ते पुन्हा मासेमारीसाठी सज्ज झाले आहेत. पालघर जिल्ह्यात विस्तीर्ण समुद्रकिनारा असून, मासेमारी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. जुलैच्या अखेरीपर्यंत मासेमारी बंद ठेवण्याचा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला होता. पुढील महिन्यापासून (ता. १) मासेमारी करण्यासाठी मच्छीमार समुद्रमार्गाचा प्रवास करणार आहेत. जीव धोक्यात घालून खलाशी, कामगार खोल समुद्रात जाणार आहेत. या वेळी जीवनावश्यक वस्तूंचा लागणारा साठा बोटींमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी बोटींची आकर्षक सजावट, रंगरंगोटी, दुरुस्ती, साहित्याची जमवाजमव करण्यात येत आहे. बोटीत जाणाऱ्या खलाशांचा विमा, ओळखपत्र असे सोपस्कार पार पडले जाणार आहेत. एकीकडे अवकाळी पाऊस, वादळ आणि उंच लाटांचा मारा यामुळे मासेमारी उत्पन्नावर परिणाम जाणवला आहे. त्यातच बंदी कालावधीत हाताला काम मिळाले नाही.
पालघर जिल्ह्यात डहाणू, पालघर, सातपाटी, वसई अर्नाळा, नायगाव समुद्रकिनारी एकूण दोन हजारांहून अधिक बोटी आहेत. पापलेट, मांदेली, कोळंबी, कोता, घोळ, सुरमई, वाघूळ, हलवा, दाढा, रावस मासेमारी करून उत्पन्न मिळवते. यावर खलाशांपासून ते वाहतूक, कामगार, बर्फ कारखान्यांसह अनेक जण अवलंबून असतात. पुन्हा मासेमारी सुरू होणार असल्याने मासेमारीला वेग मिळणार आहे.
खवय्यांना पापलेटची प्रतीक्षा
जिह्यातील समुद्रात मिळणारा पापलेट मासा हा अत्यंत चविष्ट असल्याने मांसाहारी खवय्यांची पहिली पसंती असते. गेले दोन महिने मासेमारीबंदीमुळे माशांचे प्रमाण कमी झाले. अशातच मासेमारी सुरू होणार असून, पापलेटवर ताव कधी मारता येईल, याची प्रतीक्षा खवय्ये करत आहेत.
मंडईमध्ये मांसाहारासाठी गर्दी
श्रावण महिना शुक्रवार (ता. २५)पासून सुरू होत आहे. या कालावधीत उपवास पाळला जातो. त्यामुळे मांसाहार बंद केले जाते. त्यामुळे मांसाहार खवय्यांची बाजार मंडईत मासे खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. अशातच परराज्यातून मासे हे बाजारात येऊ लागले आहेत व त्याला दरदेखील अधिक प्रमाणात आहे.
पुढील महिन्यापासून पुन्हा मच्छीमार बोटी घेऊन मासेमारीसाठी जाणार आहेत. देवदर्शन झाल्यानंतर आता प्रवासात लागणारे महत्त्वाचे साहित्याची तयारी केली जात आहे. बोटींची दुरुस्ती, अन्य काम पूर्ण होत आले आहे. समुद्रात वादळ घोंघावू नये, दर्याची कृपा मच्छीमारांवर राहावी, अशी प्रार्थना केली जाणार आहे.
- निनाद पाटील, कोळीबांधव, अर्नाळा
पालघर ते उत्तनपर्यंत असलेले मच्छीमार सज्ज झाले आहेत. जाळी विणण्यापासून अन्य कामे शेवटच्या टप्प्यात सुरू आहेत. विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यानजीक असणाऱ्या कोळीबांधवांना व त्यावर उपजीविका करणाऱ्या नागरिकांना उत्पन्नाचा मार्ग खुला होणार आहे.
- बर्नड डिमेलो, कार्याध्यक्ष, अखिल भारतीय मच्छीमार कृती समिती
पालघर जिल्ह्यात परवानाधारक दोन हजार २२ बोटी आहे. तीन वर्षांपर्यंत परवाना मच्छीमार बोटींना दिला जातो, ज्यांची परवाना मुदत संपली आहे, त्यांना १ ऑगस्टला परवाना देण्याची कार्यवाही पालघर मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात येत आहे.
- दिनेश पाटील, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, पालघर-ठाणे
मच्छीचा सध्याचा भाव (किलोमागे रुपयांत)
पापलेट (५०० ग्रॅमपेक्षा अधिक वजन) २,२००
पापलेट (२५० ते ३०० ग्रॅम) १,२०० ते १,४००
घोळ १,०००
सुरमई ८०० ते ९००
कोळंबी ६०० ते ७००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.