फेर मतमोजणीत दावे- प्रतिदावे

फेर मतमोजणीत दावे- प्रतिदावे

Published on

फेर मतमोजणीत दावे-प्रतिदावे
शिवसेना ठाकरे गट-निवडणूक आयोगामध्ये जुंपली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासंदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी फेर तपासणी करण्यात आली आहे; मात्र या फेर तपासणीवरून पुन्हा शिवसेना ठाकरे गट आणि निवडणूक आयोगामध्ये जुंपली आहे. ही फेर तपासणी फसवी असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे; तर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ती पारदर्शक झाल्याचा दावा केला; पण हा दावा खोटा असून सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
२०२४च्या विधानसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघातील निकालावर शंका व्यक्त करीत ठाकरे गटाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार १९ जुलै रोजी नवी मुंबई, तुर्भे येथे फेर तपासणी करण्यात आली; मात्र ही तपासणी म्हणजे लपवाछपवी असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी केला होता. हे वृत्त प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशी ठाणे जिल्हा कार्यालयातून प्रसिद्धिपत्रक काढण्यात आले. यामध्ये मतमोजणीसाठी संबंधितांना पर्याय दिले होते. त्यांच्या संमतीने सर्व प्रक्रिया पार पडली असून ती पारदर्शक असल्याचा दावा केला आहे. तसेच ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी समाधानकारक झाल्याचे म्हटले आहे. यावरच ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे.

तपासणीदरम्यान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या तपासणी प्रक्रियेबाबत सुस्पष्टता न देता, प्रतिनिधींना कोणतेही प्रात्यक्षिक दाखवले गेले नाही, असा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला. त्यांनी यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना फेर तपासणीपूर्वीच लेखी पत्राद्वारे सूचना दिल्याचेही स्पष्ट केले. ठाकरे गटाच्या म्हणण्यानुसार, फेर तपासणी करताना ‘डायग्नोस्टिक चेकिंग’ हा पर्याय निवडण्यात आला. या पर्यायात फक्त एकूण मतांची संख्या दिसते, तर ‘मॉक पोल’ पर्यायातून प्रत्येक उमेदवाराला किती मते मिळाली हे दाखवले जाते. त्यामुळे तपासणीचे स्वरूपच अपूर्ण असल्याचा आरोप त्यांनी केला.

निवडणूक अधिकाऱ्यांचा दावा
मतदानाची फेर तपासणी निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या अभियंत्याद्वारे पूर्ण करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या आक्षेपानुसार कुणाला किती मतदान झाले हे न दाखवता एकूण मतदान दाखवण्यात आले; पण मॉक पोल हा पर्याय निवडल्यास केंद्रावरील संपूर्ण निकाल दाखवण्यात येता. तर डायग्नोस्टिक पर्यायामध्ये मशीनमधील एकूण मतदान दाखवण्यात येते. त्यामुळे संबंधित प्रतिनिधींनी निवडलेल्या पर्यायानुसार मतमोजणी करण्यात आली आहे.

बॅटरीची शंका कायम
ठाणे विधानसभा मतदान केंद्र क्रमांक ६८ वरील व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बॅटरी तशीच का ठेवण्यात आली होती, याकडे शिवसेना ठाकरे गटाने लक्ष वेधले होते. यावर मतदान केंद्र ६८च्या मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यावर व्हीव्हीपॅट मशीनमधील बॅटरी काढली नव्हती. हे निवडणूक अधिकाऱ्यांनीही मान्य केले आहे. ईव्हीएम मशीन तीन वेळा सुरू करावी लागते, मग ती चार वेळा सुरू कशी झाली आणि मतदान केंद्रावर चौथ्यावेळी मशीन सुरू का झाली, हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ का करण्यात येते, यावर अद्याप स्पष्टीकरण मिळालेले नाही.

सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ?
या प्रक्रियेत पारदर्शकता न पाळल्याचा आणखी एक मुद्दा म्हणजे फेर तपासणीचा सीसीटीव्ही फुटेज अद्याप न देणे. फुटेजमध्ये नेमकी काय कारवाई झाली हे पाहता आले असते; पण प्रशासन फुटेज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धिपत्रक काढून फेर तपासणी ही भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत पार पाडण्यात आल्याचा दावा केला आहे. ते पुढे म्हणाले, की प्रतिनिधींनी स्वतः ‘डायग्नोस्टिक’ पर्याय निवडला होता आणि वेगवेगळ्या उमेदवारांना त्यात मते किती मिळाली हे दाखवले जात नाही, त्यामुळे कोणताही फसवणुकीचा प्रकार घडलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com