कुलूपबंद घरांवर चोरट्यांची नजर

कुलूपबंद घरांवर चोरट्यांची नजर

Published on

कुलूपबंद घरांवर चोरट्यांची नजर
ठाणे शहरात सहा महिन्यांत ३२६ घरफोड्या; मुंब्र्यात सर्वाधिक घटना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे शहर आणि उपनगरांतील नागरिकांचे घराबाहेर पडणे धोक्याचे ठरत असून, कुलूपबंद घरे चोरट्यांचे प्रमुख लक्ष्य बनली आहेत. २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांत ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल ३२६ घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यातील अनेक घटना दिवसाढवळ्या, नागरिक नोकरी-व्यवसायासाठी बाहेर असताना घडल्याचे उघड झाले आहे. २०२४ च्या याच कालावधीत (जानेवारी ते जून) ३६४ घटनांची नोंद झाली होती. यंदा घटनांची संख्या ३२६ वर आली असली तरी मुंब्रा, कल्याण, भिवंडी यांसारख्या परिसरांमध्ये चोरीचे प्रमाण वाढलेले आढळते. पोलिसांनी यातील ११७ प्रकरणे उघडकीस आणली असून, उर्वरित प्रकरणांचा तपास सुरू आहे.

मुंबई शहराच्या बाजूला असलेल्या ठाणे आणि इतर शहरांमध्ये राहण्यासाठी नागरिकांचा ओढा अधिक पाहण्यास मिळत आहे. विशेषतः हे सर्व नोकरदारवर्ग असल्याने ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील ठाणे शहर, या कल्याण, भिवंडी, उल्हासनगरबरोबर बदलापूर-अंबरनाथ या परिसरात जास्त नागरीकरण वाढले आहे. त्यामुळे घरांना कुलूप कोयंडा लावून कामावर गेल्यावर दिवसाही घरे बंद राहतात. अशा घरांना चोरट्यांनी टार्गेट करत तीच घरे फोडून साफ केली आहेत. यामध्ये ठाणे शहर परिमंडळात सर्वाधिक ८३ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. त्यापाठोपाठ कल्याण ७७, भिवंडी ७४ , उल्हासनगर ६२ आणि वागळे या परिमंडळात ३० घरफोडीच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुंब्र्यात सर्वाधिक घरफोड्या
मुंब्रा परिसर चोरट्यांसाठी ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. पोलिस आयुक्तालयातील ३५ पोलिस ठाण्यांपैकी मुंब्रा पोलिस ठाण्यात सर्वाधिक ५५ घटना घडल्या आहेत. त्याखालोखाल नारपोली (४१), मानपाडा (२२), शांतीनगर (१७) या ठिकाणीही चोरट्यांचा सक्रिय वावर आहे. कळवा, वर्तकनगर, शिवाजीनगर, एमएफसी, अंबरनाथ, बदलापूर, कोळसेवाडी येथेही दरमहा १० ते १४ गुन्ह्यांची नोंद आहे.

दिवा परिसरात सात घरे फोडली
दिवा येथील ग्लोबल शाळेजवळील परिसरात एका रात्रीत चोरट्यांनी सात घरांत घुसून मोठ्या प्रमाणावर चोरी केली. या वेळी सोने-चांदी, रोख रक्कम, मोबाईल फोन असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. विशेष म्हणजे, एका घरात झोपलेल्या महिलेला जागे न करता गळ्यातील मंगळसूत्र काढून नेल्याची तक्रार दाखल झाली आहे.

चोरट्यांचा नवा ट्रेंड
ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर नोकरदारवर्ग स्थायिक झाला आहे. बहुतांश घरे दिवसाच्या वेळेत बंद असतात. चोरटे याच वेळेचा फायदा घेत, पाहणी करून घरफोडी करतात. ही योजना पूर्वनियोजित असते. काही ठिकाणी चोरटे सीसीटीव्ही टाळण्यासाठी चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल वापरत असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत घरफोडीच्या घटनांमध्ये ४० प्रकरणांची घट झाली आहे. सतत गुन्हे घडणाऱ्या भागांत सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण यांच्याद्वारे तपास वाढवला आहे. काही चोरट्यांवर मोक्का व एमपीडीए अंतर्गत कारवाई केली गेली आहे. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत आहे.
अमरसिंह जाधव, पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा)

परिमंडळानुसार आकडेवारी
परिमंडळ एकूण घटना उघड प्रकरणे
ठाणे ८३ २८
कल्याण ७७ ३१
भिवंडी ७४ २८
उल्हासनगर ६२ १७
वागळे ३० १३
एकूण ३२६ ११७


नागरिकांनी घ्यावयाची काळजी
घर बंद करताना शेजाऱ्यांना माहिती द्या.
सीसीटीव्ही यंत्रणा, सेन्सर अलार्म यांचा वापर करा.
सोने-चांदी घरात न ठेवता लॉकरमध्ये ठेवा.
घराच्या दरवाजाला डबल लॉकिंग सिस्टिम लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com