थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

Published on

तपस्यातर्फे श्रावण मास विशेष ‘श्लोक संध्या २०२५’ कार्यक्रम
तुर्भे (बातमीदार) : तपस्या कला फाउंडेशनच्या वतीने श्लोक संध्या २०२५ हा श्रावण मास विशेष कार्यक्रम २७ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजतस गुगल मीटवर आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात गुरू निला दामले यांनी निवडलेले ३० श्लोक मृदंगमणि सुहास ठाकूर यांनी संगीतबद्ध केले असून, मृणाली ठाकूर, कामोद काठे व श्रेयस दामले यांनी गायन केले आहे. आदिती पंडित, अपूर्वा दामले, पूजा रथ, मिहिका भिसे व प्रेरणा हवेरी यांनी श्लोकांवर नृत्यदृश्य सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अशोक पालवे व जयश्री पालवे ग्रामीण जीवनातील जीवनमूल्यांवर मार्गदर्शन करणार आहेत.
........................
बँक राष्ट्रीयीकरणदिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर
नवी मुंबई (वार्ताहर) : ५६ व्या बँक राष्ट्रीयीकरण दिनानिमित्त बँक ऑफ इंडिया मुंबई व गोवा युनिटच्या ऑफिसर्स असोसिएशनतर्फे सोमवारी एमडीआय बेलापूर येथे एक भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला सीबीडी बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलने सहकार्य केले. बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्याचे आरोग्य सुधारावे, या उद्देशाने सोमवारी एमडीआय बेलापूर येथे एक भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. फेडरेशन ऑफ बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनचे सरचिटणीस निलेश पवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्‌घाटन झाले. या शिबिरात रँडम ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, बोन मिनरल डेन्सिटोमेट्री, बॉडी कंपोझिशन ऍनालिसिस, नेत्र तपासणी शिवाय डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला. या शिबिराचा नवी मुंबई झोन, डेटा सेंटर व एमडीआय बेलापूर येथील ३५० हून अधिक कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.
..........
गुरूपौर्णिमेनिमित्त खारघरमध्ये संगीत मैफिलीचे आयोजन
नवी मुंबई (वार्ताहर) : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रदीर्घ परंपरेला वाहिलेले विदर्भातील प्रसिद्ध संगीत घराणे गेली दीडशे वर्षे शास्त्रीय संगीतामध्ये आपले वेगळे स्थान टिकवून आहे. या घराण्याची तिसरी आणि चौथी पिढी पं. डॉ. प्रकाश संगीत आणि त्यांचे पुत्र संगीत क्षेत्राची धुरा जपण्याचे कार्य अखंड करत आहेत. रविवार, २७ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता खारघर येथील मनशक्ती केंद्र सभागृहात त्यांच्या गुरूपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात त्यांच्या शिष्यांकडून सुरेल गायन सादर केले जाणार आहे. धैरवी मेहेता, अनया जोशी, उमा अमीन, अनुराग नाईक, डॉ. चैतन्य संगीत हे शिष्य आपले गायन सादर करणार आहेत. तसेच राजलक्ष्मी संगीत यांचे सतार वादन होणार आहे. गुरूपौर्णिमा समारोहाचे हे सलग अठरावे वर्ष असून, यानिमित्ताने पं. डॉ. प्रकाश संगीत स्वतही कार्यक्रमाच्या शेवटी आपले गायन सादर करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
..................
विद्याभवन शाळेत कायदेविषयक मार्गदर्शन
जुईनगर (बातमीदार) : नेरूळ येथील विद्याभवन शाळेत विद्यार्थीं प्रतिनिधी शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी लोकशाही पद्धतीने विद्यार्थ्यांमधून निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना शपथ देऊन कर्त्यव्याप्रती सजग करण्यात आले. निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित पदाच्या नावाचा बॅच आणि सन्मान पट्टा प्रदान करण्यात आला. या प्रसंगी नवी मुंबई महापालिकेचे विधी अधिकारी ॲड. अभय जाधव प्रमुख पाहुणे व संस्थेचे कुलसचिव दिनेश मिसाळ विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. ॲड. अभय जाधव यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांची ओळख करून देत सुजाण नागरिक बनण्याचा संदेश दिला. तर कायद्याचे विविध पैलू समजावून सांगत नागरिकांच्या कर्तव्यदायित्वाचा ओळख करून दिली. समाजातील विविध कायदेविषयक मार्गदर्शनक देखील विद्यार्थ्यांना करण्यात आले. या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि लोकशाहीबद्दलची साक्षरता विकसित होईल, असा विश्वास त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केला. संस्थेचे कुलसचिव दिनेश मिसाळ यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या नेतृत्वाची जबाबदारी लक्षात घेऊन इतर विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण कामकाज करत आपले कर्तुत्व आपल्या पदाचा सन्मान वाढवण्याचा सल्ला दिला. निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींचे अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीजा नायर, समन्वयक पी. बी. मुळीक, पर्यवेक्षिका अस्मिता सलगर, शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीने पार पडला. हा सोहळा शालेय जीवनातील एक संस्मरणीय क्षण असल्याची भावना निवडणून आलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शीतल येंगे यांनी केले.
................
नवी मुंबईत कॅन्सरवरील ‘सीएआर टी-सेल थेरपी’त यश
वाशी (बातमीदार) ः अपोलो रुग्णालयाने नवी मुंबईने कॅन्सरवरील नव्या तंत्रज्ञानाचा उपायोग करून दोन रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. ‘सीएआर टी-सेल थेरपी’ नावाची ही उपचारपद्धती रुग्णाच्या स्वतःच्या रोगप्रतिकारक पेशींना (टी-सेल्स) अनुवंशिकरित्या बदलून कॅन्सर पेशींवर थेट हल्ला करते. त्यामुळे ही थेरपी ‘लिविंग ड्रग’ म्हणून ओळखली जाते. या थेरपीचा उपयोग बी-सेल लिम्फोमा आणि बी-सेल ल्युकेमिया या प्रकारच्या रक्ताच्या कॅन्सरवर करण्यात येतो. ओडिशातील ४९ वर्षीय श्रीमती शर्मा आणि मुंबईचे ५७ वर्षीय दास या दोघांवर अपोलो नवी मुंबई येथे उपचार करण्यात आले. पूर्वी अनेक प्रकारचे उपचार होऊनही त्यांना फारसा फायदा झाला नव्हता. मात्र, सीएआर टी-सेल थेरपीमुळे प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून, रुग्णांनी नव्या आशेने जीवनाकडे पाहू लागले आहे. या उपचाराचे नेतृत्व डॉ. पुनीत जैन यांनी केले. हॉस्पिटलने आतापर्यंत ८५ पेक्षा अधिक यशस्वी बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले असून, त्याचा यशदर ७० टक्क्यांहून अधिक आहे. या नवीन थेरपीमुळे गंभीर रक्त कॅन्सर रुग्णांसाठी नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे, असे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
.........
भाज्यांचे दरात घसरण, गृहिणींना दिलासा
वाशी (बातमीदार) ः नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. भाजीपाल्याचे दर प्रतिकिलो १५ ते २० रुपयांनी कमी झाल्याने सर्वसामान्य ग्राहक आणि गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली आहे. एपीएमसी मार्केटमध्ये सध्या भेंडी, गवार, कारली, कोबी, फ्लॉवर, तोंडली, वांगी यांसारख्या भाज्यांचे दर घसरले असून, काही भाज्या घाऊक बाजारात ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होत आहेत. यामुळे किरकोळ बाजारात देखील दर कमी झाले असून, अनेक भाज्या ५० ते ८० रुपयांच्या दरात विकल्या जात आहेत. फक्त भाजीपालाच नाहीतर पालेभाज्यांचे दरदेखील घसरले आहेत. कोथिंबीर, पालक, मेथी यांसारख्या भाज्या आता कमी किमतीत सहज उपलब्ध होत आहेत. किरकोळ बाजारात पालक, मेथी १० ते १५ प्रति जुडीने विकली जात आहे. दरवाढीची शक्यता असलेल्या श्रावण महिन्यापूर्वी भाज्यांचे दर स्थिर किंवा घसरल्यामुळे ग्राहक समाधानी आहेत. यासंदर्भात भाजीपाला व्यापारी फुलचंद वैश्य म्हणाले की, भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे. तर श्रावण महिन्यात मात्र आणखी दर वाढण्याची शक्यता आहे.
...........
लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्ताने बालसभेचे आयोजन
पनवेल ता. २३ (बातमीदार) ः पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. त्‍याचअनुषंगाने बुधवार ता. २३ जुलै रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांच्या १६९ व्या जयंतीनिमित्त पालिकेतील सर्व शाळांमध्ये बालसभेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने पनवेल महापालिका शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार शालेय स्तरावर बालसभेंतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सर्व शाळांमध्ये लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी बालसभेंतर्गत वक्तृत्व स्पर्धेमधून लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याचा परिचय आपल्या भाषणांमधून करून दिला. याबरोबरच शिक्षकांनीदेखील लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान व समाजकार्य कथारूपाने सांगितले. बालसभेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळण्यास मदत झाली.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com