समूह विकासाद्वारे अतिधोकादायक इमारतींची पुर्ननिर्मिती
समूह विकासाद्वारे अतिधोकादायक इमारतींची पुनर्निर्मिती
चार एफएसला एकनाथ शिंदेंकडून हिरवा कंदील
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २३ ः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोडकळीस आलेल्या इमारतींचा समूह विकासाद्वारे पुनर्निर्मिती करण्यासाठी तीन ऐवजी चार एफएसआय देण्यास तत्त्वतः मंजुरी दर्शवली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील वाशी, नेरूळ, कोपरखैरणे येथील सिडकोनिर्मित अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर होणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश म्हस्के, उपनेते विजय नाहटा आणि जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी पाठपुरावा केला होता. शिंदे यांच्या मंजुरीमुळे शिवसेनेच्या पाठपुराव्यालाही यश आले आहे.
गेल्या तीन दशकांपासून नवी मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न विविध कारणांमुळे रखडून पडलेला आहे. पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला, तर भूखंडाचे कमी क्षेत्रफळ यामुळे पुनर्विकास प्रकल्पात अडथळे येत होते. काही दिवसांपूर्वी पुनर्विकासाच्या दृष्टीने पर्यावरण ना हरकत दाखला मिळण्यासाठी शिथिलता मिळाली होती. आता क्लस्टर पुनर्विकासाकरिताही शिंदे यांनी हिरवा कंदील दिल्यामुळे कमी क्षेत्रफळामुळे रखडलेल्या या इमारतींचा विकास करण्यास वेग येणार आहे.
------------------------------------
या सोसायट्यांना मिळाला दिलासा
वाशी शहरातील सेक्टर-९ मधील मे. जॅप्स को.ऑप.हौ.सो. असोसिएशन लि. आणि मे. नक्षत्र को.ऑप.हौ.सो. असोसिएशन लि. या दोन नागरी पुनरुत्थान प्रकल्पांना मंजुरी देण्याच्या दृष्टीने नवी मुंबई मनपाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६० अंतर्गत अधिसूचना जारी केली आहे. याच धर्तीवर आता वाशी, कोपरखैरणे, नेरूळ आणि घणसोली आदी भागातील १० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ आणि १८ मीटर रुंद जोडरस्ता असणाऱ्या सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या समूह पुनर्विकासाला चालना मिळणार आहे. या निर्णयामुळे रहिवाशांना मोठ्या आकाराची आणि दर्जेदार पायाभूत सुविधा असणारी घरे मिळणार आहेत.
------------------------------------
जर कोणी चार एफएसआय आणून दाखवेल, तर मी राजकारणातून संन्यास घेईन, अशी नवी मुंबईतील एका स्वयंघोषित लोकनेत्याने वल्गना केली होती. शिवसेनेने आता चार एफएसआयचा मार्ग मोकळा केला आहे. अशा परिस्थितीत वल्गना केल्याप्रमाणे या लोकनेते यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा, असे आवाहन आहे.
किशोर पाटकर, नवी मुंबई जिल्हाप्रमुख, शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.