भिवंडीत मेट्रोसाठी पुन्हा विरोधाची ठिणगी
भिवंडी, ता. २३ (बातमीदार) : भिवंडी महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यानुसार मेट्रो रेल्वेसाठी बायपास राजीवगांधी चौक, कल्याण नाका आणि कल्याणनाका ते अंजूरफाटा या मार्गाचे रस्तारुंदीकरण प्रस्तावित आहे. मागील आठवड्यापासून सीमांकनाचे काम सुरू झाले. मात्र, या रस्त्याच्या रुंदीकरणावर स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे. वारंवार होणाऱ्या विरोधामुळे तीन वर्षांपासून मेट्रो-५ हा प्रकल्प रखडला आहे. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील हजारो नोकरदार, प्रवासी, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.
भिवंडी महापालिकेच्या नगररचना विभागाने नियोजनबद्ध विकासाच्या हेतूने नव्याने प्रारूप आराखडा बनवला आहे. त्यानुसार शहरात मेट्रोनिमित्ताने अंजूरफाटा ते कल्याण नाका आणि कल्याण नाका ते भिवंडी साईबाबा बायपासपर्यंत रस्तारुंदीकरण करण्याची तरतूद केली आहे. ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो-५ या मेट्रो मार्गाचे काम शहरातील धामणकर नाकापर्यंत पूर्ण होत आले आहे. मात्र, आजबीबी ते पाईपलाईन या दरम्यानच्या नागरिकांचे आक्षेप आल्याने हे काम थांबले होते. त्यामुळे हा प्रकल्प तीन वर्षांपासून रेंगाळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी कल्याण नाका येथे जमिनीखालून मेट्रो नेण्यासाठी हिरवा झेंडा दाखवून निधीची तरतूद केली. यासाठी येणाऱ्या खर्चात भिवंडी शहरातील वंजारपाटी ते रामेश्वर मंदिर आणि कल्याणरोड बायपास असा दुहेरी वाहतुकीचा उड्डाणपूल आणि त्यावर नागपूरच्या धर्तीवर डबलडेकर मेट्रो प्रकल्प राबवण्याची मागणी आमदार महेश चौघुले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यामुळे शहरात वाहतूक कोंडी होणार नाही. यापूर्वीही आमदार रईस शेख आणि खासदार सुरेश म्हात्रे यांनी डबलडेकर मेट्रो रेल्वेची मागणी केली आहे.
कल्याण रोड आणि अंजूरफाटा रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक असल्याने महापालिकेने प्रारूप आराखड्यानुसार कल्याण रोडच्या दोन्ही बाजूंना ६-६ मीटरचे मार्किंग करून १५ दिवसांच्या आत मालमत्ता पाडण्याचे आदेश भिवंडी महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. पालिका अधिकाऱ्यांनी सीमांकन आणि निष्कासन करण्याचे काम मागील आठवड्यापासून सुरू केले आहे. यासाठी उपायुक्त (मुख्यालय) विक्रम दराडे यांनी कार्यालयीन आदेश जारी केले आहे.
भिवंडीवासीयांना मेट्रोचे वेध
राज्य सरकारने मेट्रोच्या कामास गती दिल्याने संपूर्ण यंत्रणा मेट्रोच्या कामाला जुंपली आहे. येत्या १५ दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे आदेश पालिकेचे उपायुक्त दराडे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहे. या घटनेने पुन्हा कल्याण रोड व अंजूरफाटा मार्गावरील व्यापारी आणि रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. पर्यायी जागेसाठी त्यांची धावपळ सुरू झाली आहे. भिवंडीतील नागरिकांसाठी मेट्रोची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी सत्ताधारी आणि विरोधकही प्रयत्नशील आहेत. त्यामुळे लवकरच मेट्रो-५ चे काम पूर्ण होईल, असे वेध भिवंडीवासीयांना लागले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.