कागदापासून साकारला बाप्पा
कागदापासून साकारला ‘बाप्पा’
पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीला प्रतिसाद
गायत्री ठाकूर ः सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना आता मूर्त स्वरूपात आकार घेऊ लागली असून, डोंबिवलीतील पराग पारधी यांनी जुन्या पेपरपासून साकारलेल्या गणेशमूर्तींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मागील पाच वर्षे ते शाडू मातीऐवजी पेपरपासून बाप्पा घडवत असून, यंदाही त्यांच्या ३०० ते ४०० मूर्तींना जोरदार मागणी मिळते आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे जलप्रदूषण वाढत असतानाच सर्जनशील आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच पुढे आलेली एक अभिनव कल्पना म्हणजे पेपरपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती होय. प्रकाश पराग पारधी हे पेपरपासून गणेशमूर्ती तयार करीत आहेत. अशा गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मुख्यत्वे जुने वर्तमानपत्र, पेपर, पुठ्ठे गोंद, पाणी आणि नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. या माध्यमातून केवळ मूर्ती तयार केली जात नाही, तर सर्जनशीलता, शाश्वततेचा विचार आणि नैतिक मूल्यांची शिकवणदेखील दिली जाते. मूर्ती तयार करण्याची पद्धतही अत्यंत सुलभ आहे.
आधी जुना कागद बारीक फाडून पाण्यात भिजवून ठेवला जातो. त्यानंतर तो मिक्सरमध्ये वाटून लगदा तयार केला जातो. या लगद्यात गोंद आणि थोडीशी पिठी मिसळून एकसंध पेस्ट तयार केली जाते. त्यातून साच्याच्या सहाय्याने मूर्तीला हळूहळू आकार दिला जातो. एकदा मूर्ती कोरडी झाली की, तिला नैसर्गिक रंगांनी सजवले जाते. या मूर्तीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे सुलभ विसर्जन होय.
जलप्रदूषण टाळण्यासाठी ही मूर्ती घरातच बादलीत किंवा टबमध्ये विसर्जित करता येते. काहीजण तर बाप्पाच्या मूर्तीला बागेत विसर्जित करून तिच्या लगद्यातून झाडेही लावतात, त्यामुळे गणपती उत्सवानंतर एक नवीन झाड रोवले जाते.
मूर्ती बनवण्याची प्रक्रिया
जुने वर्तमानपत्र, कागद आणि पुठ्ठा पाण्यात भिजवले जातात. नंतर हे साहित्य मिक्सरमधून वाटून लगदा तयार केला जातो. त्यात गोंद आणि थोडीशी पिठी मिसळून पेस्ट बनते. ही पेस्ट साच्यात घालून मूर्तीला आकार दिला जातो. कोरडी झाल्यावर मूर्तीला नैसर्गिक रंगांनी रंगवले जाते.
सर्जनशीलता आणि श्रद्धेचा संगम
पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींपेक्षा, पेपरपासून तयार केलेल्या मूर्तींचे सुलभ विसर्जन आणि पर्यावरणावर होणारा सकारात्मक परिणाम हे या उपक्रमाचे मुख्य आकर्षण ठरत आहे. दरवर्षी एक फुटापासून २० फुटांपर्यंतच्या मूर्ती तयार केल्या जातात. त्यात विविध रूपांतले बाप्पा साकारले जाता श्रीमंत दगडूशेठ हलवाई, पद्मासनातील, म्हैसुरी, पेशवाई अशी अनेक रूपे साकारली जातात. त्यामुळे स्थानिक कारागिरांनाही रोजगाराचे साधन मिळते.
मूर्तीची वैशिष्ट्ये
मूर्तीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे घरच्या घरी बादलीत किंवा टबमध्ये विसर्जन करता येते. काहीजण विसर्जनानंतर उरलेल्या लगद्यातून रोपे लावतात, म्हणजे गणेशोत्सवानंतर बाप्पाच्या आशीर्वादाने एक नवीन झाड जन्माला येते.
मी लहानपणापासून शाडू मातीच्या मूर्ती बनवत होतो; पण गेल्या पाच वर्षांपासून पर्यावरणाच्या दृष्टीने पेपरमूर्ती करायला सुरुवात केली. सुरुवातीला प्रसिद्धी नव्हती; पण आता लोक स्वतःहून बुकिंग करीत आहेत. यंदाचे सर्व बुकिंग पूर्ण झाले असून अजूनही कॉल येत आहेत.
- पराग पारधी, मूर्तिकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.