घणसोलीतील सेंट्रल पार्कला पार्किंगचा विळखा; नागरिकांमध्ये नाराजी
घणसोलीतील सेंट्रल पार्कला पार्किंगचा विळखा; नागरिकांमध्ये नाराजी
तुर्भे, ता. २३ (बातमीदार) : घणसोली रेल्वेस्थानकासमोरील सेंट्रल पार्कच्या परिसरात पार्किंग झोनमध्ये बेकायदा वाहनांची गर्दी वाढली आहे. परिसरातील व्यावसायिक व खासगी वाहनचालकांनी दिवस-रात्र वाहने उभी करून ठाण मांडल्यामुळे स्थानिकांसह उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना पार्किंगसाठी जागा मिळण्यात अडचण येत आहे. यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी पसरली असून, महापालिकेकडून तत्काळ कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
सेंट्रल पार्क हा नवी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला उपक्रम आहे. येथे सकाळी ६ ते १० व सायंकाळी ५ ते ९ या वेळेत नागरिकांना प्रवेश दिला जातो. या वेळी व्यायाम, सकस चालणे, जलतरण तलावात पोहणे व करमणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करतात, मात्र पार्किंगसाठी असलेल्या ठरावीक झोनमध्ये दिवसभर, अगदी रात्रीही बेकायदा वाहने उभी राहात असल्याने इतर वाहनचालकांना जागा मिळत नाही. विशेष म्हणजे, या पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करताना नियम धाब्यावर बसवले जात आहेत. येथील नियुक्त सुरक्षा रक्षक वारंवार यावर तक्रार करत असले तरीही त्यांचा कोणीही ऐकत नसल्याचे सांगण्यात येते. पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई न झाल्यामुळे बेकायदा पार्किंग करणाऱ्यांचे मनोबल वाढले आहे.
...................
रात्री नशा आणि गैरकृत्यांचा ठिकाणा?
पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या काही वाहनांमध्ये रात्रीच्या वेळी नशा करणे, मद्यपान करणे, अश्लील वर्तन करणे आदी प्रकार सुरू असल्याचेदेखील स्थानिक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अंधाराचा फायदा घेऊन काही तरुण मंडळी येथे गोंधळ घालतात. त्यामुळे कुटुंबासह पार्कमध्ये येणाऱ्या नागरिकांचीही गैरसोय होते. पार्कमध्ये नियुक्त सुरक्षा रक्षक वेळोवेळी अवैध पार्किंगबाबत सूचना करतात, मात्र त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ही जागा केवळ पार्किंगसाठी नव्हे, तर बेकायदेशीर हालचालींसाठी केंद्र बनली आहे.
.......................
नेत्यांची तीव्र प्रतिक्रिया
या प्रकारावर भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य कृष्णा पाटील यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, मी गेल्या वर्षभरापासून फोटोसह संबंधित विभागांना तक्रारी करत आहे, मात्र त्याकडे दुलर्क्ष केले जात आहे. प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही, म्हणूनच हे सर्व प्रकार बिनधास्त सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.