शेतकरी ‘प्रधानमंत्री पीक विमा’च्या प्रतीक्षेत

शेतकरी ‘प्रधानमंत्री पीक विमा’च्या प्रतीक्षेत

Published on

शेतकरी ‘प्रधानमंत्री पीक विमा’च्या प्रतीक्षेत
८८ लाखांची रक्कम वर्षभरानंतरही थकीत
पाली, ता. २३ (बातमीदार) : नैसर्गिक आपत्ती, बदलते हवामान आणि त्यातून होणारे शेतीचे नुकसान यावर उपाय म्हणून राबवली जाणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी केवळ आश्वासन बनून राहिली आहे. रायगड जिल्ह्यातील सुमारे १,१७२ शेतकऱ्यांना आजही सुमारे **८८ लाख रुपयांची विमा रक्कम** मिळालेली नाही. वर्षभर उलटूनही ही थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे त्यांचे संकट अधिकच वाढले आहे.
जिल्ह्यातील एकूण ९३ हजार हेक्टरहून अधिक भातलागवडीखालील क्षेत्र असून, यापैकी बहुतांश शेतकरी पावसावर अवलंबून शेती करतात. त्यामुळे अतिवृष्टी, पावसातील खंड, पूर, गारपीट, दुष्काळ अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे दरवर्षी शेतीचे मोठे नुकसान होते. यावर आधारभूत संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून आर्थिक नुकसान भरून काढण्याची अपेक्षा असते, परंतु अंमलबजावणीत होत असलेल्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नाही.
..................
चौकट
आधार लिंक नसल्याचा फटका
पीक विमा योजनेत सहभागी होताना शेतकऱ्यांची संपूर्ण बँक तपशिलांसह आधार क्रमांकाची नोंद घेतली जाते, मात्र अनेक शेतकऱ्यांची बँक खाती आधार क्रमांकाशी लिंक नसल्यामुळे विम्याच्या रकमेच्या वितरणात अडथळा निर्माण झाला आहे. बँक व सेतू केंद्रांमध्ये जाऊन ही लिंकिंग प्रक्रिया करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना वेळ, पैसे आणि ऊर्जा वाया घालावी लागत आहे. लिंकिंग पूर्ण न झाल्याने हजारो शेतकरी अद्यापही विमा रकमेपासून वंचित आहेत.
.................
चौकट
कशासाठी मिळतो विमा?
२०२४-२५ खरीप हंगामासाठी लागू करण्यात आलेल्या या योजनेत खालील बाबींसाठी विमा संरक्षण आहे :
* पेरणी न होणे
* अतिवृष्टी, पूर, दुष्काळ
* गारपीट, वीज कोसळणे, भूस्खलन
* ढगफुटी व शेतातील सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे नुकसान
या सर्व नैसर्गिक संकटांमुळे शेतीचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ही योजना राबवली जाते.
............
विमा रकमेची प्रतीक्षा
या योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ करिता २० हजार ९३.१४ हेक्टर क्षेत्रासाठी ४० हजार ३४७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. अतिवृष्टी व इतर कारणांमुळे झालेल्या नुकसानीमध्ये एक हजार ८२० शेतकरी विम्यासाठी पात्र ठरले. या शेतकऱ्यांचा विमा मंजूर करण्यात आला. त्यासाठी एक कोटी ३२ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. एक हजार ८२० शेतकऱ्यांपैकी ६४८ शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देण्यात आले. एकूण ४३ लाख रुपयांचा निधी या शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला, पण आता २०२४ चा खरीप हंगाम संपून २०२५ चा खरीप हंगाम सुरू झाला आहे, मात्र अजूनपर्यंत पात्र असलेले एक हजार १७२ शेतकरी विम्याच्या रकमेपासून वंचित असल्याचा प्रकार समोर आला आहे. या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
..................
जिल्ह्यातील ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी विम्याची नोंदणी केली आहे. एक हजार ८०० हून अधिक शेतकऱ्यांचा विमा मंजूर झाला आहे. त्याचा निधीही प्राप्त झाला आहे. विम्याची रक्कम देण्याचे काम सुरू झाले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे विम्याची रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. लवकरात लवकर सर्वच शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जाईल. जिल्ह्यात यावर्षीदेखील विमा नोंदणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
-वंदना शिंदे, अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com