पनवेल स्थानकात प्रवाशांची कोंडी
पनवेल स्थानकात प्रवाशांची कोंडी
बाहेर पडण्यासाठी अरुंद जागा; प्रवेशद्वारावर फेरीवाले, रिक्षाचालकांचा गराडा
पनवेल, ता. २३ (बातमीदार) ः पनवेल रेल्वेस्थानक भविष्यात मोठे रेल्वे जंक्शन होणार असून अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांची कोंडी होते. मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावरून सीएसएमटी, ठाणे, अंधेरीसाठी लोकल व डहाणू, वसईसाठी मेमू धावतात. तर कोकण रेल्वेमार्गे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या पनवेलमध्ये थांबतात. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते; मात्र सोयीसुविधांअभावी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो.
पनवेल- पुणे पॅसेंजर, पनवेल- गोरखपूर एक्स्प्रेस, पनवेल- नांदेड एक्स्प्रेस इ. मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस पनवेल रेल्वेस्थानकातून धावतात. याठिकाणी सहा फलाट असले तरी तीन उपनगरी तर तीन लांब पल्ल्याच्या गाड्यांकरिता वापरले जातात. रेल्वे स्थानक सिडकोने विकसित केले असून लवकरच नवीन टर्मिनस तयार होत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकातून सुटणार असल्याने प्रवाशांना मुंबई, टिळकनगर, ठाणे, कल्याण येथे जाण्याची गरज भासणार नाही.
पनवेल रेल्वेस्थानकात सुरू असलेल्या दिल्ली जेएनपीए कॉरिडॉरमुळे पूर्वीची तिकिट खिडकी, पार्किंग व पोलिस ठाणेही स्थानक परिसरात असल्याने प्रवाशांना ये-जा करण्यासाठी जागा कमी पडते.
पनवेल स्थानक सिडकोने विकसित केले असले तरी रेल्वे प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पनवेल महापालिकेनेही परिसरातील सोयी-सुविधांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. जागेअभावी रिक्षाथांब्याचा प्रश्न व बसस्थानकात प्रवाशांना अडगळीचा सामना करावा लागतो. पनवेल पालिकेने रेल्वेस्थानक परिसरातील पदपथ मोकळे करावे, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार महापालिकेकडे करण्यात आली आहे. त्याचबरोबरच पनवेल रेल्वेस्थानकासमोर सिडकोने अथवा पनवेल पालिकेने रिक्षाचालकांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रिक्षाचालक करीत आहेत.
वाहनतळावर रिक्षाचे पार्किंग
रेल्वेस्थानकातील वाहनतळावर प्रवाशांची दुचाकी व चारचाकी वाहने पे अँड पार्क पद्धतीने लावली जातात. त्या ठिकाणी प्रवाशांच्या वाहनाव्यतिरिक्त इतर वाहने लावण्यास मज्जाव असताना पनवेल स्थानकातील रिक्षाचालक हे पार्किंग ५० रुपयांची पावती फाडून बिनदिक्कत रिक्षा वाहनतळावर लावतात. त्यामुळे प्रवाशांच्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.
पादचाऱ्यांची कुचंबणा
पनवेल बसथांबा ते पनवेल रेल्वेस्थानकाच्या मार्गावर असलेल्या झोपडपट्टीधारकांनी दुकाने थाटून पदपथ गिळंकृत केले आहेत. विविध प्रकारची दुकाने व वाहन दुरुस्तीची कामे पदपथावर केली जात असल्यामुळे पादचाऱ्यांचा नाईलाज असतो. मुख्य रस्त्यावरून चालत रेल्वेस्थानकात जावे लागते. एकतर या ठिकाणचे पदपथ झोपडपट्टीतील दुकानांनी व्यापले आहेत. तसेच रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांना सोडण्यासाठी व नेण्यासाठी आलेल्या चार चाकी गाड्या व रिक्षा एका मार्गिकेवर उभ्या असल्याने नाइलाजास्तव प्रवाशांना मुख्य रस्त्याचा वापर करावा लागत असल्यामुळे या ठिकाणी अनेकवेळा अपघाताचे व वादाचे प्रसंग घडले आहेत. पादचाऱ्यांसाठी हक्काचे पदपथ मोकळे करायची विनंती प्रवासी संघटनांनी अनेक वेळा प्रशासनाला केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.