पालघरमध्ये हॉटेलवर गुजराती पाट्या
पालघरमध्ये हॉटेलांवर गुजराती पाट्या
व्यावसायिकांना मराठीचे वावडे; कामगार उपायुक्त कार्यालयाचे दुर्लक्ष
मनोर, ता. २३ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील घोडबंदर ते अच्छाडपर्यंतच्या बहुतांश हॉटेलांच्या पाट्या गुजराती भाषेत आहेत. त्यामुळे महामार्गावरून पालघर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतरही गुजरातमध्ये आल्याचाच भास होत आहे. महामार्गालगत मिरा रोडमध्ये हिंदीसक्तीविरोधात आंदोलने होत असताना महामार्गावरील गुजराती पाट्या लक्ष वेधून घेत आहेत. या पाट्यांविरोधात पालघर जिल्ह्याच्या कामगार आयुक्त कार्यालयाकडून कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालघरमध्ये मराठी भाषेतील पाट्या लावणे बंधनकारक आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे २००२मध्ये चौपदरीकरण झाले. त्यानंतर सहापदरीकरण झाल्याने महामार्गावरील वाहनांच्या वर्दळीत वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावर हॉटेलच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे महामार्गावर घोडबंदरपासून गुजरातच्या हद्दीपर्यंत मोठ्या प्रमाणात हॉटेल्स उभी राहिली आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा खाडीपासून गुजरात राज्याच्या हद्दीपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूंस हॉटेल व्यवसायाने जोर धरला आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शंभर-सव्वाशे किलोमीटर अंतरावर गुजरात राज्याची सीमा सुरू होते. तसेच महामार्गावरून मोठ्या प्रमाणात गुजराती आणि अन्य भाषिक चालक आणि प्रवाशांची ये-जा सुरू असते. हॉटेलांचे मालक महाराष्ट्राबाहेरचे आणि मोठ्या संख्येने गुजराती आहे. त्यामुळे गुजराती भाषिक गिऱ्हाइकांना हॉटेलमध्ये आकर्षित करण्यासाठी पाट्या गुजराती भाषेत लावण्याची स्पर्धा हॉटेलमालकांत निर्माण झाली आहे.
मुंबई दुकाने संस्था अधिनियमानुसार महाराष्ट्र राज्यात व्यवसाय करणाऱ्या संस्थांना मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे; परंतु कायद्याला धाब्यावर बसवून महामार्गावरील अनेक हॉटेलचालकांनी त्यांच्या हॉटेलच्या पाट्या मराठीऐवजी गुजराती भाषेत लावल्या आहेत. महाराष्ट्रात व्यवसाय करीत असताना हॉटेलचालकांकडून मराठी भाषेला दुय्यम दर्जा दिला जात आहे. त्यामुळे मराठी भाषेचा अवमान आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलचालकांवर कारवाईची मागणी पुढे येत आहे.
दरम्यान, २०१७ मध्ये पालघरच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रवासादरम्यान महामार्गावरील हॉटेलांच्या गुजराती भाषेतील पाट्यांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०१९च्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडव्याच्या सभेत महामार्गावरील गुजराती पाट्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी वसई तालुक्याच्या हद्दीत आंदोलन करून गुजराती पाट्यांची तोडफोड केली होती. त्यानंतर हा प्रश्न पूर्णपणे दुर्लक्षित झाला आहे.
--------------------------------------
महाराष्ट्र राज्यात व्यवसाय करणाऱ्या हॉटेलचालकांनी मराठी भाषेत पाट्या ठळकपणे लावणे कायद्याने बंधनकारक आहे. मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषेत पाट्या लावणाऱ्या हॉटेलांवर मुंबई दुकाने संस्था अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल.
- विजय चौधरी, सहाय्यक कामगार आयुक्त
-------------------------------
कारवाईचा तपशील
भेटी दिलेल्या आस्थापना : २३३
मराठी फलक नसलेल्या आस्थापना : ८६
मराठी फलक असलेल्या आस्थापना : ११२
भेटीनंतर मराठी फलक लागले : ३३
कारवाई झालेल्या आस्थापना : १७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.