आईच्या मायेचे माहेरघर
बदलापूर, ता. २३ (बातमीदार) : ‘डोळे नसले तरी भावनांची दृष्टी होती...’ असा अनुभव मुंबईच्या कमला कन्या अंध शाळेतील ३२ महिलांनी ‘माहेरवाशीण’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमात घेतला. बदलापूर पश्चिमेतील अंजलीनगर येथे वयाच्या सत्तरीकडे वाटचाल केलेल्या प्रभा शिर्के यांनी सुरू केलेल्या या घरामध्ये अंध महिलांनी दोन दिवस माहेरपणाची माया, आदर आणि आनंद अनुभवला.
प्रभा शिर्के यांनी आयुष्यातील एकटेपणा दूर करण्यासाठी आणि आपल्यासारख्या माहेर नसलेल्या महिलांना माहेरपण अनुभवता यावे, या विचारातून त्यांनी ‘माहेरवाशीण’ ही संकल्पना सुरू केली. यातूनच ते आपला अर्थार्जण सुद्धा भागवत असतात. नुकतेच मुंबई दादर येथील ‘कमला कन्या अंध शाळा’ येथील अनेक अंध महिला १५ व १६ जुलैला येथे आल्या होत्या. परंपरेप्रमाणे प्रभा शिर्के आणि त्यांच्या इतर सहकारी महिलांनी या महिलांची दृष्ट काढून त्यांचे पाय धुवून स्वागत केले. त्यांना पौष्टिक नाश्ता, पुरणपोळी आणि मोदकाचे गोड जेवण दिले. रात्री गाण्यांचा, गरबा आणि प्रत्येकीच्या हातावर मेहंदी काढण्यात आली. रात्री झोपताना आईच्या मायेने त्यांच्या डोक्याची मालिश आणि अंगावर पांघरुण घातले. शिर्के यांनी त्यांच्या पाहुणचारात कसलीच कसूर राहणार नाही, याची खात्री केली. नेहमीपेक्षा या माझ्या लेकी खास आहेत; त्याचे माहेरपण नेहमीपेक्षा वेगळे कसे होईल यासाठी त्यांच्यातील कला सादर करण्यासाठी दुसऱ्या दिवशी छान मैफिल भरवण्यात आली. माहेरपण अनुभवून या घरातून निघताना सगळ्यांना अश्रू अनावर झाले. प्रत्येकीने शिर्के यांचे आशीर्वाद घेत पुन्हा माहेरपणाला येऊ, असे सांगितले.
अनेकींना मिळाला रोजगार!
माहेरवाशीण ही संकल्पना प्रभा शिर्के यांनी, आयुष्याला वेगळी दिशा देण्यासाठी सुरू केली. पतीचा मृत्यू लवकर झाला. मूलबाळ नाही. माहेरी आई-वडील नसल्याने एकटेपणावर उपाय त्यांनी शोधला. आपले भलमोठे घर कुटुंबाने भरले जाईल आणि त्यामुळे अर्थार्जन सुरू होऊन स्वबळावर आणि स्वाभिमानाने जगता येईल, हा त्यामागचा उद्देश होता. घरात जवळपास सात ते आठ खोल्या आहेत. या ठिकाणी येणाऱ्या महिलांना दैनंदिन सोयी-सुविधा देण्यासाठी आणि परंपरेप्रमाणे महिलांचे माहेरपण त्यांना अनुभवता यावे, यासाठी आपल्या परिसरातील महिलांना रोजगारही दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.