उत्तर भारतीयांची मते निर्णायक!

उत्तर भारतीयांची मते निर्णायक!

Published on

संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. २३ : विधानसभा निवडणुकीनंतर वसई-विरारमधील राजकीय स्थिती बदलली आहे. पूर्वी वसई, नालासोपारा आणि बोईसर या तीन मतदारसंघांवर बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व राहिले होते, परंतु तिन्ही जागांवर या आघाडीचा पराभव झाला आहे. या मतदारसंघांमध्ये हिंदी भाषिक मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांची मते कोणाला मिळणार? यावर आतापासूनच राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करणे सोपे जाणार आहे.

वसई-विरारच्या तुलनेत उत्तर भारतीय मतदार नालासोपारा विभागात जास्त आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत उत्तर भारतीयांनी भाजपला साथ दिल्याने महापालिका निवडणुकीत ही मते भाजपलाच मिळणार असल्याचा दावा या पक्षाचे पदाधिकारी करत आहेत. मागील पालिका निवडणुकीत किरण भोईर हा भाजपचा एकमेव चेहरा निवडून आला होता. बहुजन विकास आघाडीतून १०७ नगरसेवक निवडून आले होते. बविआच्या राजकारणाचा फोकस हा सर्वसमावेशक राहिला आहे. थोडक्यात त्यांनी वसई-विरारमध्ये सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वी केल्यानेच मागील निवडणुकीत त्यांना ११५ पैकी तब्बल १०७ जागा मिळाल्या होत्या. त्यांच्याकडे जात-पात बघून तिकिटे दिली जात नाहीत, म्हणूनच गेल्या निवडणुकीत मुस्लिम नगरसेवकांची संख्याही सात होती. अनेक उत्तर भारतीयांना वेगवेगळी पदे बविआने दिली होती, तरी विधानसभेत मात्र त्यांना फटका बसला होता. त्यामुळे पालिका निवडणुकीत उत्तर भारतीय समाज हा बविआबरोबर पुन्हा उभा राहतो की, भाजपकडे वळतो, यावरच पालिका निवडणुकीची गणिते ठरणार आहेत.

महायुतीकडे मतदारांचे लक्ष
बविआ आणि भाजपनंतर उत्तर भारतीयांची मते दोन्ही शिवसेनेच्या गटांकडे आहेत. आता या निवडणुकीत भाजप महायुती म्हणून लढणार की स्वतंत्र, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने महापौर शिवसेनेचाच, असे जाहीर केल्याने महायुती होणार का? यावरही चर्चा रंगत आहेत. जर महायुती झाली नाही, तर उत्तर भारतीयांची मते विभागली जाऊन त्याचा फायदा बविआला होणार असल्याचे राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

विकासकामांचे आश्वासन
महापालिकेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत विरोधकांचे २१ नगरसेवक निवडून आले होते, पण त्यानंतरच्या निवडणुकीत विरोधकांनी दोन अंकी आकडा गाठला नव्हता. त्यामुळे या वेळी भाजपने महापालिकेच्या निवडणुकीसाठी जोर लावल्याचे दिसत आहे. त्यासाठी विकासकामांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसन्न झाले असून, अनेक आश्वासनांचा पूर या ठिकाणी येत आहे. त्याचा कितपत फायदा भाजप उचलते, हे बघण्यासारखे असणार आहे. उत्तर भारतीयांची मते एकगट्टा कोणाकडे जातात की, त्याचे विभाजन होते, यावर भाजपच्या विजयाची गणिते ठरणार आहेत.

नगरसेवकांची पक्षनिहाय संख्या
भाजप १
बविआ १०७
काँग्रेस ०
राष्ट्रवादी ०
मनसे १
शिवसेना ५
अपक्ष १
एकूण ११५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com