कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद
कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद
प्रशासकाच्या मनमानी कारभाराचा आरोप
कल्याण, ता. २३ ( वार्ताहर) : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी बाजार समितीवरील प्रशासकाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ बुधवारी (ता.२३) एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला. या बंदमध्ये बाजार समितीमधील सर्व व्यापारी, माथाडी संघटना सहभागी झाल्याने बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठप्प पडले होते.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक तथा ठाणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था किशोर मांडे यांनी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचा भंग करीत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील इतर सेवासुविधांसाठी विकास आराखड्यात राखीव असलेला सर्व्हे क्रमांक २८२ व २८४ मधील ५००० चौरस मीटर भूखंड १० वर्षांच्या भाडेतत्त्वावर लक्ष्मी मार्केट भाजीपाला व्यापारी संघटनेला देण्याबाबतचा भाडेपट्टा करार केल्याचा आरोप होत आहे. तसेच या जागेवर भविष्यात कोणतेही तात्पुरते किंवा कायमस्वरूपी गाळे निर्माण केल्यास वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते. याच्याच निषेधार्थ कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यापारी बांधवांनी बुधवारी एकदिवसीय लाक्षणिक बंद पुकारण्याचा निर्णय घेतला होता. या आंदोलनाला शेतकरी, व्यापारी, माथाडी, मापाडी, हमाल आदी घटकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. यात फळ व भाजीपाला घाऊक विक्रेता संघ, कल्याण कांदा-बटाटा-लसूण होलसेल व्यापारी असोसिएशन (रजि.), कल्याण फुटस मर्चेट असोसिएशन, कल्याण फूल मार्केट व्यापारी संघटना कल्याण, ओम शिवम जन कल्याण वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन यासह इतर अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक किशोर मांडे यांनी कमी कालावधीत काही धोरणात्मक निर्णय घेतले, त्यामध्ये पाच हजार चौरस मीटरचा भूखंड एका संस्थेला दिला. यामध्ये कोणतीही टेंडर प्रोसेस न करता नूतनीकरणाच्या नावाखाली मोक्याचा भूखंड बेकायदा दिला आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या व्यापार करणाऱ्यांसाठी सुविधा भूखंड म्हणून असलेली जागा बाधित झाली आहे. असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. तसेच याच्या निषेधार्थ ६० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच संघटितरित्या बंद पुकारल्याची माहिती फळ व भाजीपाला घाऊक विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष गणेश पोखरकर यांनी दिली.
न्यायालयात याचिका
फक्त रस्त्यावरची लढाई नसून याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्याची सुनावणी उद्यापासून सुरू होणार आहे. तिथे आम्हाला न्याय मिळेल, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा असल्याचे गणेश पोखरकर यांनी सांगितले. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दररोज नाशिक, अहिल्यानगर, जुन्नर, पुणे परिसरातून भाजीपाल्याचे सुमारे ४५० ट्रक येतात. फळांचे १५० ट्रक, फुलांचे २०० ट्रक येतात. याशिवाय विविध प्रकारचे धान्य वाहून नेणारी सुमारे शंभरहून अधिक वाहने येतात. बाजार समितीत बंद असल्याने पुरवठादार व्यापाऱ्यांनी बुधवारी बाजार समितीकडे पाठ फिरवली.
भाजीपाल्याचे भाव किंचित वधारले
कल्याण, डोंबिवली, मुरबाड, कसारा, शहापूर, भिवंडी परिसरातील किरकोळ व्यापाऱ्यांना या बंदचा सर्वाधिक फटका बसला. बाजार समितीत दररोज सुमारे दीड कोटी रुपयांची उलाढाल होते, तर व्यापाऱ्यांच्या या बंदमुळे घाऊक बाजार बंद असल्याने याचा परिणाम किरकोळ बाजारावर झाला. यामुळे भाजीपाल्याचे भाव किंचित वधारले होते. या वेळी फळ व भाजीपाला घाऊक विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष गणेश पोखरकर, उपाध्यक्ष कमरुद्दीन शेख, सदस्य सदाशिव टाकळकर, गणेश टाकळकर, सुशिल येवले, प्रफुल्ल घोणे, योगेश मोडवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊ नरवडे, गिरीष पाटील, इस्माईल बागवान, शफिक बागवान, वसंती देढीया, नरेंद्र परमार, राम वर्मा, विलास पाटील आदी व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.