नवी मुंबईत तोतया पोलिसांचा सुळसुळाट;

नवी मुंबईत तोतया पोलिसांचा सुळसुळाट;

Published on

नवी मुंबईत तोतया पोलिसांचा सुळसुळाट;
एका दिवशी ५.७० लाखांचे दागिने लांबवले
नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) ः नवी मुंबईत पोलिस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकांना गंडवणाऱ्या टोळीने मंगळवारी एकाच दिवशी तीन ठिकाणी हात साफ केला. पनवेल, खारघर आणि सानपाडा या भागात झालेल्या घटनांमध्ये या भामट्यांनी तीन ज्येष्ठ नागरिकांकडून एकूण पाच लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. पनवेल शहर, खारघर आणि सानपाडा पोलिसांनी घटनेची नोंद करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. याच प्रकारची फसवणूक मागील महिन्यातही झाली होती आणि आता या घटनांची वारंवारता वाढल्याने खऱ्या पोलिसांसमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पहिली घटना : पनवेलमध्ये २.७० लाखांचे दागिने गायब
पनवेलमधील बावन बंगलोज परिसरात राहणारे नरेश मिराई (७३) हे सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते. त्या वेळी दोन भामटे त्यांच्या जवळ आले आणि “आम्ही सीआयडी ऑफिसर्स आहोत, परिसरात चोरट्यांची वर्दळ आहे” असे सांगून त्यांना घाबरवले. त्यांनी अंगावरील सोन्याची चेन व दोन अंगठ्या (किंमत २.७० लाख रुपये) काढायला लावल्या. त्यातील एकाने दागिने खिशात ठेवतो असे सांगत हातचलाखीने दागिने लंपास केले आणि दोघे मोटारसायकलवरून पसार झाले.
दुसरी घटना : सानपाड्यात वृद्धाची फसवणूक
सानपाड्याचे विलास भोसले (७७) हे दुपारी ११.४५ वाजता भाजी खरेदीसाठी बाहेर पडले असताना ‘बधाई स्वीट’ दुकानाजवळ दोन व्यक्तींनी त्यांना पोलिस असल्याचा बनाव केला. परिसरात चोरी-मारामारी होत असल्याचे सांगून त्यांना दागिने काढायला लावले. अडीच लाख रुपये किमतीची चेन व अंगठी रुमालात गुंडाळून देतो असे सांगून भामट्यांनी दागिने लंपास केले आणि रिकामा रुमाल देऊन पसार झाले.
तिसरी घटना : खारघरमध्ये ५० हजारांची अंगठी चोरी
विश्वनाथ कदम (७८) हे साताऱ्याहून खारघरमधील मुलाकडे काही दिवसांसाठी आले होते. ते खारघर सेक्टर-७ मधील जीएसटी कॉलनी रस्त्यावर फिरत असताना तिघा भामट्यांनी त्यांना थांबवले. त्यांनीही पोलिस असल्याचे सांगून परिसरात चोरी झाली आहे, असे सांगितले आणि त्यांच्या हातातील ५० हजारांची अंगठी चोरली.
.....................
पोलिसांचे तपास सुरू
तिन्ही घटनांमध्ये आरोपींची कार्यपद्धती सारखीच असून, त्यांची एकच टोळी असण्याचा पोलिसांचा संशय आहे. प्रत्येक वेळी आरोपींनी पोलिस असल्याचे भासवून भीती दाखवली आणि वृद्धांना दागिने काढायला लावून हातचलाखीने चोरले.
.................
नागरिकांना इशारा
या घटनांमुळे नवी मुंबईतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अशा अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. कोणतीही शासकीय किंवा पोलिस ओळख न देता दागिने काढायला सांगणाऱ्यांपासून दूर राहावे, तसेच अशा व्यक्तींबद्दल तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com