उल्हासनगरात गुन्हेगारांच्या ‘दहशतीची पोलिसांकडून धिंड’

उल्हासनगरात गुन्हेगारांच्या ‘दहशतीची पोलिसांकडून धिंड’

Published on

उल्हासनगरात गुन्हेगारांची धिंड!
उन्माद नडला; जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अहवाल

उल्हासनगर, ता. २३ (वार्ताहर) : खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव, विनयभंग आणि हत्यार बाळगण्यासारख्या गंभीर आरोपांखाली जामिनावर सुटलेले आरोपी उल्हासनगरात पुन्हा दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत होते. आरोपींनी जामिनावर बाहेर आल्यानंतर फटाके फोडून, बेकायदा मिरवणूक काढून आणि सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून पोलिसांना थेट आव्हान दिले होते. बुधवारी (ता. २३) सायंकाळी पोलिस विभागाने या प्रकरणातील काही आरोपींना अटक करून त्या आरोपींची धिंड काढून परिसरात फिरवून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. दुसरीकडे पोलिसांनी आरोपींचा जामीन रद्द व्हावा म्हणून ठाणे न्यायालयात अधिकृत अहवालही सादर केला आहे.

२७ एप्रिल २०२५ रोजी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिस ठाण्यात गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करून विनयभंग आणि बेदम मारहाण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपी रोहित बिपीन झा, आशीष ऊर्फ सोनामणी झा, रेखा झा, आराधना झा, हंसू झा, बिपीन झा, बिट्टू यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी काही आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. जामीन मंजुरीवेळी फिर्यादी आणि साक्षीदारांनी नाहरकत पत्र दिल्याने आरोपींना सशर्त मुक्तता मिळाली होती. जामिनावर सुटल्यानंतर १७ जुलैला आरोपी रोहित झा व आशीष झा यांनी समर्थकांसह रमाबाई आंबेडकरनगर परिसरात फटाके फोडून बेकायदा मिरवणूक काढली. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. त्यामुळे उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपी रोहित झा, आशीष झा, सागर सुरडकर यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात संजय सुरडकर याला अटक करण्यात आली असून, एक विधी संघर्षित बालकही सहभागी असल्याची माहिती असून त्याच्या पालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्याच दिवशी दुसऱ्या गुन्ह्यांतील आरोपी दिवाकर यादव व इतर आरोपींनीही मिरवणूक काढून गोंधळ घातल्याने त्यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करून दिवाकर यादवला अटक करण्यात आली. या गुन्ह्यांनंतर पोलिस विभागाने या आरोपींचा जामीन रद्द व्हावा, यासाठी २२ जुलैला ठाणे जिल्हा न्यायालयात सहाय्यक सरकारी वकिलामार्फत अधिकृत अहवाल सादर केला आहे. विशेष म्हणजे, आज संध्याकाळी उल्हासनगर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची धिंड काढून त्यांना संपूर्ण परिसरात फिरवले.
आरोपीच्या या अशा कृत्यामुळे उल्हासनगरमध्ये कायद्याचा धाक कमी होत चालल्याचे स्पष्ट झाले आहे; मात्र पोलिसांनी तातडीने सुरू केलेली कारवाई, जामीन रद्द करण्यासाठीचा पाठपुरावा आणि आरोपींची धिंड काढण्यासारख्या धडक पावलामुळे नागरिकांत काहीसा दिलासा निर्माण झाला आहे. आता न्यायालयाचा निर्णय आणि पोलिसांचा तपास यावरच या गुन्हेगारी साखळीचा पुढचा अध्याय अवलंबून आहे.

---
मिरवणूक अन्‌ व्‍हिडिओचा पुरावा
पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांत मिरवणूक, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आणि जमावबंदी आदेशाच्या उल्लंघनाचा ठळक उल्लेख आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com