एका क्लिकवर मिळणार डाटा
शहापूर, ता. २४ (बातमीदार) : आगामी ठाणे जिल्हा परिषद, शहापूर पंचायत समिती आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहापूर तालुक्यातील भाजपच्या तीन मंडळाध्यक्षांना अत्याधुनिक ‘टॅब’ वितरित करून पक्षाने ग्रामीण भागातील कामकाज अधिक कार्यक्षम व डिजिटल बनवण्याची दिशा पकडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही पक्षाचे हायटेक स्वरूप पाहायला मिळत आहे.
पूर्वी फॅक्स व ई-मेलच्या माध्यमातून पाठवली जाणारी माहिती, आता मंडळाध्यक्ष थेट कार्यक्रमाच्या ठिकाणाहून ऑनलाइन पद्धतीने प्रदेश कार्यालयाला पाठवू शकणार आहेत. यात मंडळातील सदस्य संख्या, पक्षाच्या कार्यक्रम, भागधारकांची माहिती यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे भाजपचे संघटनात्मक कामकाज आता एका क्लिकवर अधिक गतिमान आणि पारदर्शक होणार आहे. भाजपने पदाधिकाऱ्यांच्या हाती टॅब देऊन त्यांना हायटेक बनविल्याने पक्षाचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते टॅबस्नेही बनले आहेत.
प्रत्येक मंडळाध्यक्षांच्या हातात भाजपने अत्याधुनिक ''टॅब'' दिला आहे. शहापूर तालुक्यातील तीन मंडळाध्यक्षांना टॅब दिला असून, त्याद्वारे मंडळातील माहिती, तसेच पक्षाच्या विविध कार्यक्रमांतील माहिती त्याच ठिकाणाहून प्रदेशला सादर करावी लागणार आहे. या बदलामुळे पक्षाच्या गतिमान कामकाजात सुधारणा होणार असून, भविष्यात मिळालेली माहिती निवडणूक रणनीतीसाठी वापरली जाणार आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’ व अन्य राष्ट्रीय कार्यक्रमही मंडळाध्यक्ष टॅबवरून थेट पाहू शकतील. त्यामुळे वेळेची बचत व थेट संवाद साधण्याची क्षमता वाढणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संघटनात्मक कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी शहापूर तालुक्यातील पूर्व मंडळाध्यक्ष सुभाष हरड, दक्षिण मंडळाध्यक्ष दीपक बोंबे आणि उत्तर मंडळाध्यक्ष प्रकाश सांडे अशा तिघांना हे टॅब दिले आहेत. पक्षाचे विविध ॲप या टॅबमध्ये असणार आहेत.
फॅक्स झाले कालबाह्य
१८ वर्षांपूर्वी भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरून घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या माहितीसाठी फॅक्स याच दूरसंचार साधनाचा वापर केला जात होता. फॅक्सद्वारे माहिती प्रदेश कार्यालयात पाठवली जात होती. त्यानंतर ती माहिती फॅक्सद्वारेच जिल्ह्यांमधील भाजपच्या कार्यालयांना पाठवली जात होती. या प्रक्रियेमध्ये बराच वेळ वायफळ जात होता. त्यानंतर ई - मेलद्वारे हे कामकाज करण्यात येऊ लागले होते. आता सध्या पक्षाचे सर्वच संघटनात्मक कार्यक्रम हायटेक बनले आहे.
संघटनात्मक कामकाज परिणामकारकरीत्या व्हावे, या हेतूने हा बदल केला आहे. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात व अन्य कार्यक्रम या टॅबवरून ऑनलाइन मंडळाध्यक्षांना पाहता येणार आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या वेळेत बचत होणार आहे.
- भास्कर जाधव, तालुकाध्यक्ष, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.