डोंबिवली परिसरात बिनदिक्कत उभ्या आहेत हातगाड्या

डोंबिवली परिसरात बिनदिक्कत उभ्या आहेत हातगाड्या

Published on

‘या’ हातगाड्यांना कोणाचे अभय
पालिका म्हणते हातगाडीच नाही ः डोंबिवली परिसरात बिनदिक्कत हातगाड्या उभ्या
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ ः शहरात सध्या हातगाड्यांवर खाद्यपदार्थांची विक्री बिनदिक्कत केली जात आहे. शाळा, कॉलेज, स्थानक परिसरात या हातगाड्या मोठ्या प्रमाणात असून, यांना नक्की कोणाचा आश्रय मिळत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. उघड्यावर खाद्यपदार्थविक्रीमुळे साथीच्या आजारांनादेखील निमंत्रण दिले जात असल्याने पालिका प्रशासन याकडे गांर्भीयाने कधी लक्ष देते हे पाहावे लागेल.
पावसाळा हा आजारांना आमंत्रण देणारा ऋतू असल्याने उघड्यावरील खाल्ल्याने अनेक संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते, परंतु पावसाळ्यात गरमागरम भजी, वडापाव, चायनीज या पदार्थांना पसंती दिली जाते. हे पदार्थ बनविताना स्वच्छतेची काळजी कोणी घेते की नाही, याकडे लक्ष दिले जात नाही. पालिका प्रशासनाकडून अशा बेकायदा हातगाड्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे, मात्र प्रशासन त्याकडे कानाडोळा करत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

‘या’ परिसरात हातगाड्या
कागदोपत्री परिसरात एकही हातगाडी नसल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे, मात्र शहरातील स्टेशन परिसर, शाळा, कॉलेजच्या बाहेर सर्रास हातगाड्या लागत असून, त्यावर खाद्यपदार्थांची जोरदार विक्री सुरू असते. डोंबिवली स्टेशन परिसर, पेंढरकर महाविद्यालयाजवळील खाऊ गल्ली, केळकर रोड, दत्तनगर परिसर, प्रगती महाविद्यालय आदी परिसरात हातगाड्या लागल्याचे दिसून आले आहे. आमदार, खासदारांचे पोस्टर गाड्यांवर लावून त्यावर पदार्थांची विक्री केली जात आहे. शिव वडापावच्या नावाखाली चायनीज गाड्या चालविल्या जात आहेत. त्याची चौकशी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पालिका अधिकारी फिरकतही नाही
पालिका अधिकारी या गाड्यांकडे फिरकतदेखील नसल्याचे विक्रेते सांगतात. यामुळे या हातगाड्या कोणाच्या आश्रयाने चालत आहेत. त्यांना कोणाचा नक्की वरदहस्त आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी वारंवार पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

घाणीचे साम्राज्य
शहरात जिथे हातगाड्या लागत आहेत, तिकडे आजूबाजूला कचरा, घाणीचे साम्राज्य आहे. स्वच्छतेची कोणतीही काळजी हे विक्रेते घेताना दिसत नाहीत. हातगाडी चालविण्याची परवानगी घेतली असल्यास ती परवानगी दर्शनी भागात लावणे. तसेच स्वच्छतेची काळजी घेणे बंधनकारक करायला हवे. खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासली जाणे गरजेचे आहे, मात्र हे काही होताना दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com