कोळी राजाची मासेमारीसाठी लगबग सुरू
कोळी राजा दर्याकडे झेपावणार
कोळी राजाची मासेमारीसाठी लगबग सुरू; जेमतेम तयारीसाठी आठवडा बाकी
मुरूड, ता. २४ (बातमीदार) ः किनारपट्टीवरील कोळीबांधवांची सक्तीची विश्रांती संपत आली असून, पोटाची खळगी भरण्यासाठी तमाम मच्छीमारांची होड्या लोटण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. १ ऑगस्टपासून धूमधडाक्यात नवी आशा घेऊन जयमल्हारचा उद्घोष करीत कोळी राजा दर्याकडे झेपावणार आहे.
मत्स्य विभागाच्या शासन आदेशानुसार, १ जून ते ३१ जुलै हा मत्स्यप्रजननाला अनुकूल मोसम असल्यामुळे सक्तीने संपूर्ण किनारपट्टीवरील मासेमारी बंद ठेवण्यात येते. या काळात मच्छीमाराला रापण पद्धतीने किनाऱ्यालगत छोटी-मोठी मासळी मारून जेमतेम गुजराण शक्य होते. उर्वरित वेळात होड्यांची बारीक-सारीक दुरुस्ती, रंगरंगोटी, सुटे भाग बदलणे, इंजिनचे तेलपाणी, जाळी सुकवूून तिची निगा राखणे, नवीन जाळी विणणे आदी कामे प्राधान्याने केली जातात.
मुरूड तालुक्यात आतापर्यंत एक हजार ६०२ मिमी पावसाची नोंद झाली असून, दर्याचा राजा अद्यापही शांत झालेला दिसत नाही. तालुक्यात सुमारे ११ मच्छीमार संस्था कार्यरत आहेत. दरम्यान, मायबाप सरकार आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी वेळोवेळी मदत करते. तेव्हा आर्थिक स्वरूपात मत्स्यबंदी काळात थोडीफार आर्थिक मदत मच्छीमार बांधवांनादेखील करावी, अशी अपेक्षा राज्य मच्छीमार संघाचे संचालक मनोहर बैले यांनी व्यक्त केली.
मत्स्य सोसायट्या अडचणीत
अलीकडे राज्य शासनाने मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देऊ केल्यामुळे मच्छीमारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. एकीकडे डिझेल परतावे वेळेवर न मिळाल्याने नाखवा, तांडेल व खलाशी सर्वच अडचणीत सापडल्याची तक्रार केली जाते, तर दुसरीकडे लाभार्थ्याच्या खात्यात थेट रक्कम जमा होत असल्याने मत्स्य सोसायट्यांच्या डिझेलच्या बाक्या वाढत असल्याची समस्या मांडली जाते.
मच्छीमारांची आर्थिक स्थिती बिकट
मच्छीमारांचे जीवन खरे तर अत्यंत खडतर व कष्टप्रद आहे. जून-जुलै महिन्यात उत्पन्नाचे साधन बंद असले तरी कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते, औषधपाणी आदीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चामुळे त्यांची आर्थिक स्थिती खूपच बिकट बनते. त्यातून शासनाकडून काही अर्थसहाय्य मिळते का अशी विचारणा मत्स्यविकास सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांकडे केली जाते. एनसीडीसीकडूनही हात आखडता घेतल्यामुळे नवीन होड्यांची बांधणी वाढत नसल्याची खंत अनुदान न मिळालेल्या मच्छीमारांकडून सांगितली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.