कातकरी महिलांनी स्थलांतराला शोधला पर्याय
महिलांनी शोधला स्थलांतराला पर्याय
गटशेतीचा यशस्वी प्रयोग; चिखलगाव वाडीतील भवानी बचत गटाचा उपक्रम
अमित गवळे, सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. २४ (वार्ताहर) : भाताचे कोठार असणाऱ्या रायगड जिल्ह्यात भातशेतीचे क्षेत्र घटत आहे. दुसरीकडे या शाश्वत रोजगारात घट झाल्याने रोजगारासाठी राज्यात-परराज्यात होणारे स्थलांतर वाढत आहे. त्या अनुषंगाने सुधागड तालुक्यातील चिखलगाव आदिवासी वाडी येथील ‘भवानी बचत गटातील’ कातकरी महिलांनी स्थलांतराच्या समस्येला पर्याय शोधत गटशेतीचा यशस्वी प्रयोग सुरू केला आहे.
पिढ्यानपिढ्या इतरांच्या शेतात मजुरी करणाऱ्या या आदिवासी महिलांनी स्वतःसाठी काम करून वर्षभरासाठी अन्नसुरक्षा निर्माण करण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. या मार्गक्रमणात महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ या संस्थेने त्यांना शेतीतील मार्गदर्शन व सहकार्य दिले. मजुरीसाठी दरवर्षी परराज्यात स्थलांतर करावे लागणाऱ्या या महिलांनी यंदा स्वतः भातशेती करण्याचा निर्णय घेतला असून, शनिवारी (ता. १९) त्यांनी एकत्र येऊन भातलावणी केली.
...............
प्रशासन आणि संस्थांचा सहभाग
भातलावणीच्या या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम, शेती व आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ अमित निंबाळकर, समाजबंध संस्थेचे सचिन आशा सुभाष, कृषी सहाय्यक, विभाग कृषी अधिकारी, प्रबोधन युवा प्रेरणा शिबिरातील युवा आणि महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळाची टीम उपस्थित होती. कृषी अधिकारी दयावंती कदम यांनी रोपलावणीच्या आधुनिक पद्धतींचे मार्गदर्शन केले व प्रत्यक्ष लावणीमध्ये सहभागी होऊन प्रात्यक्षिक सादर केले. याआधी बीजप्रक्रिया कार्यशाळा घेऊन ‘जया’ व ‘कोमल’ जातीच्या बियाण्यांची योग्य प्रकारे प्रक्रिया करण्यात आली होती.
.................
कोट :
एकीकडे आदिवासींच्या जल-जंगल-जमीन या नैसर्गिक अधिकारांवर अतिक्रमण होत असतानाच, कातकरी महिलांनी समोर येऊन आधुनिक पद्धतीने गटशेती सुरू केली आहे, हा एक आदर्श उपक्रम आहे.
- सतीश शिर्के, समन्वयक, महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ, सुधागड-पाली
...................
चौकट :
स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न
आदिवासी समाजातील रोजगारासाठी होणारे स्थलांतर हा एक मोठा सामाजिक व प्रशासकीय प्रश्न आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ संस्था महिलांच्या गटांना शेती, कडधान्य-तृणधान्य लागवड, वनौपज व वनौषधी आधारित उपक्रमांसाठी प्रेरित करत आहे. सुधागड तालुक्यातील १६ आदिवासी वाड्यांमध्ये संस्था काम करत असून, मच्छीमार, शेतकरी, वनाधिकार यांसारख्या विविध घटकांसाठी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. गटशेती हा त्याच उपक्रमाचा एक भाग आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.