३ वर्षात ६ टक्क्यांनी वाढ,

३ वर्षात ६ टक्क्यांनी वाढ,

Published on

राज्यात प्रोस्टेट कर्करोगाचे वाढते रुग्ण
तीन वर्षांत सहा टक्क्यांनी वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : राज्यात प्रोस्टेट कर्करोगाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ग्लोबोकॉन-२०२३च्या जागतिक अहवालानुसार २०२३मध्ये महाराष्ट्रात प्रोस्टेट कर्करोगाचे पाच हजार १५० नवीन रुग्ण आढळले आहेत, जे २०२०च्या तुलनेत ६.९ टक्के जास्त आहे. टाटा रुग्णालयात २०२४मध्ये ११ हजार रुग्णांनी प्रोस्टेट कर्करोगाच्या उपचारांसाठी नोंदणी केली आहे. प्रोस्टेट कर्करोगाचा धोकादायक पैलू म्हणजे त्याचे निदानास होणारा विलंब असल्याचे म्हटले जाते.

टाटा मेमोरियल सेंटरच्या अहवालानुसार, ५८ टक्के रुग्णांचे निदान प्रगत अवस्थेत होत आहे. टाटा कर्करोग रुग्णालयाच्या एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले की, आता हा आजार ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्येही आढळत आहे.

ग्राफिक्स
शहरी भागात राहणारे लोक अधिक प्रभावित
गेल्या वर्षाच्या अखेरीस देशभरात १.१५ लाख प्रकरणे नोंदवली गेली.

भारतात प्रोस्टेट कर्करोग सातव्या क्रमाकांवर
भारतातील पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोग हा सातव्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या कर्करोग नोंदणी अहवालानुसार, २०२३मध्ये देशभरात प्रोस्टेट कर्करोगाचे ४२ हजार ६४० नवीन रुग्ण आढळले. तर २०२४च्या अखेरीस ही संख्या सव्वा लाखापर्यंत वाढली. ग्लोबोकॉनच्या अहवालानुसार, शहरी भागात राहणाऱ्या लोकांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरूसारख्या शहरांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे.

मोफत आणि अनिवार्य चाचणीची आवश्यकता
आयसीएमआरने शिफारस केली होती, की ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक पुरुषासाठी दरवर्षी मोफत पीएसए चाचणी अनिवार्य करावी. टाटा कर्करोग रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे, की आरोग्य मंत्रालयाला आता स्तन, गर्भाशय ग्रीवा आणि तोंडाच्या कर्करोगांप्रमाणेच प्रोस्टेट कर्करोगासाठी स्वतंत्र नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्याची आवश्यकता वाटत आहे.

मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूसारख्या महानगरांमध्ये या कर्करोगाने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. पुरुषांच्या कर्करोगाबद्दल अनेक गैरसमज आहेत. एनसीडीआयआरच्या अहवालानुसार, भारतातील ६० टक्के पुरुषांना प्रोस्टेट कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांची माहिती नव्हती. वारंवार लघवी होणे, लघवी करण्यास त्रास होणे, लघवीत रक्त येणे आणि पाठदुखी ही लक्षणे या आजाराचे संकेत देतात.
- डॉ. गगन प्रकाश, युरो-ऑन्कोलॉजी विभागाचे प्राध्यापक, टाटा रुग्णालय

प्रोस्टेट कर्करोगाचे ४२ टक्के रुग्ण लठ्ठ
आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की प्रोस्टेट कर्करोगाचे ४२ टक्के रुग्ण लठ्ठ होते, तर ३५ टक्के रुग्ण मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाने ग्रस्त होते. बदलती जीवनशैली, मद्यपान आणि तंबाखूचे सेवन यामुळेही ही समस्या वाढत आहे. प्रोस्टेट-स्पेसिफिक अँटीजेन (पीएसए) चाचणीद्वारे हा आजार आढळतो. पुरुषांमध्ये त्याचा वापर खूपच मर्यादित आहे.

- २०२० मध्ये कर्करोगामुळे जगभरात एक कोटी लोकांचा मृत्यू
- जगभरात होणाऱ्या सहा मृत्यूंमध्ये एका कर्करुग्णाचा समावेश असतो
- प्रोस्टेट कर्करोगाची १.४१ दशलक्ष प्रकरणे

२०२०मध्ये कर्करोगाने झालेल्या मृत्यूची कारणे
फुप्फुस (१.८० दशलक्ष मृत्यू)
कोलन आणि रेक्टम (९१६,००० मृत्यू)
यकृत (८३०,००० मृत्यू)
पोटाचा कर्करोग (७,६९,००० मृत्यू)
स्तन (६,८५,००० मृत्यू)
दरवर्षी, अंदाजे ४,००,००० मुलांना कर्करोग
गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग २३ देशांमध्ये सर्वात सामान्य आढळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com