थोडक्‍यात नवी मुंबई

थोडक्‍यात नवी मुंबई

Published on

थोडक्‍यात नवी मुंबई
नेरूळमध्ये सफाई कर्मऱ्यांसाठी स्नेहभोजन
जुईनगर, ता. २४ (बातमीदार) : नवी मुंबई शहराला नुकताच स्वच्छ शहराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर या यशामागील खऱ्या शिल्पकारांचा गौरव करण्यासाठी नेरूळमध्ये एक आगळावेगळा स्नेहभोजन सोहळा पार पडला. हा कार्यक्रम काशीकृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बुधवारी (ता. २३ जुलै) पार पडला. या वेळी सफाई कर्मऱ्यांसाठी स्‍नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सफाई कर्मचारी, आशा वर्कर्स, डॉक्टर, परिचारिका, घरकाम करणारे कर्मचारी आणि शिक्षक यांचा ‘नवी मुंबईच्या स्वच्छतेमागचे खरे हीरो’ असा गौरव करून त्यांना सामाजिक कृतज्ञतेने सन्मानित करण्यात आले. स्नेहभोजन सोहळा देवनाथ म्हात्रे यांच्या कार्यालयात पार पडला. काशीकृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी आणि आयोजक म्हात्रे यांनी सांगितले, की हे कर्मवीर केवळ आपले कर्तव्य बजावत नाहीत, तर सामाजिक समर्पणाची शिकवण देतात. त्यांना केवळ मान नव्हे, तर मन:पूर्वक धन्यवाद देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक एकात्मतेला बळकटी देण्याचा उद्देश होता. या वेळी माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, देवनाथ म्हात्रे, जयवंत म्हात्रे, ट्रस्टचे पदाधिकारी, प्रगती मित्र मंडळाचे कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थ व विविध क्षेत्रांतील मान्यवर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
..................
नवी मुंबई को-ऑप. हौसिंग फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची निवड
नवी मुंबई (वार्ताहर) : नवी मुंबई को-ऑप. हौसिंग फेडरेशन लि. या सहकारी संस्थेच्या निवडून आलेल्या नवनियुक्त व्यवस्थापक समिती सदस्यांमधून अध्यक्ष, खजिनदार व सचिव या पदांची गुरुवारी निवड आयोजित पहिल्या संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आली. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील आदेशानुसार या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक गुरुवारी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (सिडको), नवी मुंबई यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सुनील चौधरी यांची अध्यक्षपदी, भास्कर म्हात्रे यांची सचिवपदी व पांडुरंग क्षेत्रमाडे यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड करण्यात आली. नवी मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना भेडसावत असलेल्या समस्या सोडवण्यात हौसिंग फेडरेशन नेहमीच तत्पर राहील, असे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी सांगितले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सहकार भारतीचे अध्यक्ष प्रमोद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
...................
वाशीमध्ये महिलांसाठी पारंपरिक मंगळागौर महोत्सव
तुर्भे (बातमीदार) : श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने बेलापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी भव्य मंगळागौर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २७ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली. कार्यक्रमात पारंपरिक गाणी, नृत्य, खेळ तसेच लाट्या बाई लाट्या, फू बाई फू, गठुडे केले यांसारखे पारंपरिक खेळ सादर होणार आहेत. उत्कृष्ट कलाविष्कार करणाऱ्या महिलांना प्रथम पारितोषिक ५००१, द्वितीय ३००१, तृतीय २००१ रुपये आणि उत्तेजनार्थ १००१ रुपये अशी बक्षिसे दिली जातील. तसेच लकी ड्रॉ अंतर्गत पैठणी, नथ इत्यादी आकर्षक बक्षिसे दिली जातील. मराठमोळ्या वेशभूषेतील महिला सहभागी स्पर्धेत विशेष पैठणी मिळवू शकतील. नोंदणीची अंतिम तारीख २५ जुलै संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असून, सहभाग विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी आरती राऊल (९९६७६४८०९१), मंदार म्हात्रे (९५९४०३०९०९) यांना करावा.
...................
विद्यार्थ्यांसह पालकांचा देशी वृक्षारोपणात सहभाग
वाशी (बातमीदार) : ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ उपक्रमांतर्गत दिघा येथील शाळा क्र. १०८ आणि ७९ मधील विद्यार्थ्यांनी १४० देशी वृक्षांची लागवड केली. यामध्ये निंब, अर्जुन, आवळा, करंज, जांभूळ या देशी प्रजातींचा समावेश आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या पालकांनीही सहभाग घेतला. याशिवाय झोपडपट्टी पुनर्वसन संस्थेच्या सदस्यांनी ७५ वृक्ष, तर ग्रीन वर्ल्ड इमारतीसमोरील मोकळ्या जागेत २५ वृक्षांची लागवड करण्यात आली. हा उपक्रम सहाय्यक आयुक्त नैनेश बदले, स्वच्छता अधिकारी प्रवीण थोरात आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
..................
तुर्भे विभाग कार्यालयात वाचन संस्कृतीला चालना
तुर्भे (बातमीदार) : ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीनुसार तुर्भे विभाग कार्यालयात बुक स्टँड उभारण्यात आला आहे. यामुळे नागरिक आणि कर्मचारी वर्गासाठी विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध झाली असून, वाचनाची आवड वाढावी यासाठी सहाय्यक आयुक्त सागर मोरे यांनी हा स्तुत्य उपक्रम सुरू केला. सामाजिक कार्यकर्ते मंगेश म्हात्रे यांनी याचे कौतुक करीत इतर विभागांनीही असाच उपक्रम राबवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
...................
सीबीडी बेलापूर येथे अजगराची सुटका
नेरूळ (बातमीदार) : सीबीडी बेलापूर सेक्टर ८ येथील दुर्गामातानगरामध्ये जाळ्यात अडकलेल्या १० फूट लांब अजगराची सुटका सर्पमित्र अष्टविनायक मोरे आणि भरत पुजारी यांनी केली. सर्पमित्रांनी काळजीपूर्वक जाळे कापून अजगराला कोणतीही इजा न करता त्याला सुरक्षितरीत्या जंगलात सोडले. हा अजगर बिनविषारी असून, वन विभागाशी समन्वय साधून त्‍याची सुटका करण्यात आली. साप दिसल्यास नागरिकांनी त्याला मारू नये, सर्पमित्रांना कळवावे, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com