शौचालयांच्या साफसफाईवर देखरेखीसाठी सॉफ्टवेअर
शौचालयांच्या साफसफाईवर पालिकेची नजर
सॉफ्टवेअरची मदत; आधी व नंतरचे छायाचित्र करावे लागणार अपलोड
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता चांगल्या पद्धतीने व्हावी, यासाठी आता पालिका प्रशासन सरसावले आहे. शौचालयांच्या स्वच्छतेवर देखरेख ठेवण्यासाठी सॉफ्टवेअरची मदत घेण्यात येणार आहे. ठेकेदाराला शौचालयाच्या साफसफाईपूर्वी आणि नंतर असे दोन्ही वेळचे छायाचित्र त्या सॉफ्टवेअरवर अपलोड करावे लागणार आहे. त्यातून शौचालयांच्या साफसफाईची माहिती पालिकेला मिळण्यास मदत होणार आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, ठेकेदार अंतिम करण्यात आला असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
ठाणे पालिका क्षेत्रात आजही सार्वजनिक शौचालयांचा नागरिकांकडून वापर करण्यात येतो. त्यातच झोपडपट्टी भागात असलेल्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था आजही काही ठिकाणी बिकट आहे. या दुरवस्था व अस्वच्छतेमुळे आजारांचे मूळ येथेच असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ठाणे पालिकेच्या माध्यमातून दरवर्षी शौचालयांच्या साफसफाईबरोबर किरकोळ दुरुस्तीची एकत्रित कामे ही ठेकेदाराच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. त्यासाठी पालिकेने वार्षिक १० कोटींचा खर्च अपेक्षित धरून त्याची निविदा प्रक्रियादेखील राबविली होती. प्रत्येक प्रभाग समितीत एक ठेकेदार अशी नऊ प्रभाग समित्यांत नियुक्ती केली गेली आहे. या ठेकेदारांमार्फत सार्वजनिक शौचालयांची साफसफाईची काम केली जात आहेत. दरम्यान, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती झाल्यानंतर ती चांगल्या स्थितीत राहावीत व त्यांची स्वच्छतादेखील चांगली राहावी. यासाठी एका सॉफ्टवेअरची मदत पालिकेचा घनकचरा विभाग घेणार आहे.
शौचालयांच्या दुरुस्तीचे काम हाती
उपमुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या संकल्पनेअंतर्गत विविध कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यात सार्वजनिक शौचालयांची झालेली दयनीय अवस्थादेखील बदलण्याकडे महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. पालिकेने आता शहरातील ९०० शौचालयांचा सर्व्हे केला आहे. त्यात या शौचालयांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या दुरुस्तीत कडीकोयंडा, २४ तास पाणी, विजेची व्यवस्था, दरवाजे, खिडक्या, पाण्याच्या टाकी बसविणे अशी कामे यात केली गेली आहेत.
स्वच्छतेची माहिती ॲपवर
त्यानुसार प्रत्येक प्रभात समितीतील ठेकेदाराला एक ॲप डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. त्याच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीला शौचालयाच्या ठिकाणी जाऊनच साफसफाई आधी व नंतर असे दोन्ही फोटो अपलोड करणे गरजेचे आहे. त्यातून घनकचरा विभागाला योग्य साफसफाई झाली की नाही याची माहिती मिळणार असून, ती कोणी आणि किती वेळा केली याची इत्थंभूत माहिती उपलब्ध होणार आहे.
प्रस्तावाला महासभेत मंजुरी
याकरिता वर्षाला २४ लाख ५० हजार रुपये खर्च येणार असून, यासंदर्भातील या प्रस्तावाला प्रशासकीय महासभेत मंजुरी दिली आहे. तसेच निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदारदेखील अंतिम करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.