रेलवन अ‍ॅप इंग्रजी-हिंदीत; मराठीचा पूर्णतः बळी

रेलवन अ‍ॅप इंग्रजी-हिंदीत; मराठीचा पूर्णतः बळी

Published on

‘रेलवन’बाबत तिकीट तपासनीस अनभिज्ञ
प्रवाशांसोबत वादावादी; मराठी भाषेचाही समावेश नाही
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : रेल्वे मंत्रालयाने मोठा गाजावाजा करून आणलेले ‘रेलवन’ अ‍ॅपमुळे प्रवाशांसाठी फायदेशीर नव्हे, तर अधिक गोंधळ आणि गैरसोयीचे ठरत आहे. खुद्द रेल्वे कर्मचारीच याबाबत अनभिज्ञ असून, या ॲपच्या माध्यमातून लोकल तिकीट काढल्यानंतरही अनेक प्रवाशांना अडवले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे अ‍ॅपमध्ये सध्या केवळ इंग्रजी आणि हिंदी भाषेचाच समावेश असून, मराठीसह अन्य प्रादेशिक भाषा त्यावर उपलब्धच नाही. परिणामी, महाराष्ट्रातील अनेक रेल्वे प्रवाशांना हे अ‍ॅप वापरताना अडचणी येत आहेत.  
उपनगरी रेल्वे प्रवाशांनी ‘रेलवन’ ॲपद्वारे काढलेले तिकीट वैध असल्याचे तिकीट तपासनीसांना मान्य नसल्याचा अनेक प्रवाशांना अनुभव आला आहे. तुम्ही यूटीएसवरून तिकीट काढा, हे अ‍ॅप आम्हाला माहीत नाही, अशा कर्मचारी प्रवाशांना खडसावत असल्याचे प्रकार समोर आले आहे. तिकीट तपासणीवेळी अनेक कर्मचाऱ्यांनी अ‍ॅपवरचे तिकीटच ओळखले नाही, ही अतिशय गंभीर बाब असल्याचे प्रवासी संघटनेचे मत आहे.
----
प्रवासी काय म्हणाले?
१. सीएसएमटी स्थानकावरून नियमित प्रवास करणाऱ्या समीक्षा नाईक यांनी ‘रेलवन’चा अनुभव सांगितला. या ॲपवरून तिकीट काढल्यावर लोकलमध्ये तपासनीसांनी ‘हे काय आहे, हे आम्हाला माहिती नाही’, अशा शब्दांत मला फटकारले. वैध तिकीट असूनही मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली.
२. सांताक्रूझ येथील राजू सावंत म्हणाले, ‘रेलवन’ अ‍ॅपवरून काढलेल्या तिकिटाचे स्क्रीनशॉट दाखवूनही कर्मचाऱ्याने ते नाकारले. उलट यूटीएसवरूनच तिकीट काढण्याची मागणी केली. रेल्वेच्याच अधिकृत अ‍ॅपबाबत कर्मचाऱ्यांनाच माहिती नाही, त्यामुळे आमची गैरसोय होत आहे.
 -----
प्रवाशांच्या अडचणी सोडवणार
‘रेलवन’  अ‍ॅपसंदर्भात आम्ही सर्व तिकीट तपासनीस आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती दिली आहे. याविषयी काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास त्या आम्हाला कळवाव्यात. प्रवाशांचा अनुभव सुलभ करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
 -----------
‘रेलवन’मध्ये मराठी भाषा नसणे ही प्रवाशांची थट्टा आहे. अ‍ॅप सादर करण्यापूर्वी तिकीट तपासनीसांना प्रशिक्षणही न देणे हे चुकीचे आहे. अर्धवट डिजिटायझेशनमुळे प्रवाशांचा त्रासच वाढतो. रेल्वेने याकडे लक्ष द्यावे.
- लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ
---
‘रेलवन’ ॲप चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी फारच गोंधळात झाली आहे. मराठीसारख्या प्रादेशिक भाषा नसल्याने अनेक प्रवाशांना अ‍ॅप वापरणे कठीण जात आहे. रेल्वेने कर्मचाऱ्यांना अ‍ॅपबाबत प्रशिक्षण द्यावे.
- वंदना सोनावणे, अध्यक्षा, महाराष्ट्र महिला प्रवासी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com