शेकडो गावांना जलदिलासा

शेकडो गावांना जलदिलासा

Published on

रोहा, ता. २६ (बातमीदार)ः रायगड जिल्ह्यात मेमध्ये अवकाळी पाऊस तुफान बरसला होता. त्यानंतर जूनमध्ये मोसमी पाऊस सक्रिय झाला. तर जुलैमध्येही पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. दोन ते अडीच महिन्यांच्या कालवधीत जिल्ह्यातील सर्वदूर भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेकडो गावे, वाडी वस्त्यांमधील लोकांची पाणीटंचाईच्या संकटातून मुक्ती झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील कोलाड येथील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत २८ धरणांपैकी २४ धरणांत १०० टक्के जलसाठा जमा झाला आहे. तर एक धरणात ७५ ते ९९ टक्के पाणीसाठा तर दोन धरणांत ५० ते ७५ टक्के तर एका धरणात ५० टक्केच्या आत जलसाठा उपलब्ध असल्याची नोंद आहे. रायगड जिल्ह्यातील जवळपास ९५ टक्के धरणे भरल्याने वर्षभर शहरी तसेच ग्रामीण भागातील असंख्य गावांना पाणीपुरवठा होणार आहे.
------------------------------------------------------
‘या’ धरणांची जलपूर्ती
रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी (रोहा), पाभरे (म्हसळा), संदेरी (म्हसळा), खिंडवाडी (महाड), भिलवले (खालापूर), कोथुर्डे (महाड), खैरे (महाड), वरंध (महाड), कोंडगाव (सुधागड), उन्हेरे (सुधागड), कवेळे (सुधागड), भिलवले (खालापूर), वावा (तळा), फणसाड (मुरूड), घोटवडे (सुधागड), कलोते-मोकाशी (खालापूर), डोणवत (खालापूर), आंबेघर (पेण), उसरण (पनवेल), मोरबे (पनवेल), अवसरे (कर्जत), बामणोली (पनवेल), ढोकशेत (सुधागड), कुडकी (श्रीवर्धन), साळोख (कर्जत) या धरणांत १०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
-------------------------------------
रानिवली धरणात दुर्भिक्ष
श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरणात ७५ टक्के ते ९९ टक्केपर्यंत जलसाठा पुनाडे (उरण), श्रीगाव (अलिबाग) या दोन धरणांत ५० ते ७५ टक्के जलसाठा आहे. तर दुसरीकडे मागील अडीच महिने जिल्हाभर भरपूर पाऊस पडूनसुद्धा श्रीवर्धन तालुक्यातील रानिवली धरणात ५० टक्क्यापेक्षा कमी प्रमाणात पाणीसाठा असल्याची नोंद आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com