पालघरच्या संस्कृती संवर्धनासाठी वन उद्यान
पालघर, ता. २६ (बातमीदार) : जिल्ह्यातील जैवविविधता राखून आदिवासी बांधवांबरोबर येथील अन्य समाजातील संस्कृतीचे जतन करून सर्वसामान्य नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात राहत असल्याच्या प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या दृष्टीने राज्यातील एक अतिशय नमुनेदार पर्यटन केंद्र निर्माण करण्याच्या दृष्टीने पालघर जिल्हा मुख्यालय परिसरात दोनशे एकर जमिनीवर वन विभागातर्फे वन उद्यान उभारण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी नियोजन समितीच्या बैठकीत दिली.
पालघर जिल्ह्याची निर्मिती करताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालघर शहरालगत देशातील एक मॉडेल असे जिल्हाधिकारी कॅम्पस उभारण्यात येईल, अशी घोषणा केली होती. ती प्रत्यक्षात अमलात आणली आहे. त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी कॅम्पसलगत पालघर नगर परिषद क्षेत्रातील टेंभोडे-खारेकुरण गावादरम्यान ९३.४ हेक्टर वन विभागाचे संरक्षक जमीन आहे. या जमिनीची निवड वनउद्यान बनवण्यासाठी करण्यात आली असल्याची माहिती जिल्ह्यातील डहाणू येथील उपवन संरक्षक अधिकारी निरंजन दिवाकर यांनी दिली.
या उद्यानामुळे परिसरातील नागरिकांसाठी उपयोगी साधन निर्माण होणार आहे. वनविद्यानात नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी विशेष निसर्ग मार्ग उभारण्यात येणार आहेत. उद्यानाच्या ९० किलोमीटरच्या परिघात पाच लाखांहून अधिक नागरी वस्ती आहे. यामुळे या उद्यानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभेल व निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची एक सुवर्णसंधी या नागरिकांना उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या उद्यानात नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी विशेष निसर्ग मार्ग करण्यात येणार आहे. याविषयीच्या अभ्यासक्रमाला विविध नैसर्गिक घटकांचा अभ्यास व त्यावर संशोधन करण्यासाठी पूरक ठरणार आहे, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आल्याची माहिती डहाणूचे उपभोग संरक्षण अधिकारी निरंजन दिवाकर यांनी दिली. या उद्यानाच्या प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला असून त्याला वन विभागातून मान्यता घेण्यात येत आहे. या उद्यानाच्या उभारणीकरिता येणारा खर्च जिल्हा नियोजन समितीकडून मिळणार आहे. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था, तसेच सीएसआर फंडातूनदेखील यासाठी निधी उपलब्ध करून घेतला जाणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
या उद्यानात इको लर्निंग झोन, इको मनोरंजन रिक्रेशन, इको तलाव, इको साहस ॲडव्हेंचर, कौशल्य विकास केंद्र, निसर्ग पार्क, मुलांसाठी वन कल्पना, आदिवासी सांस्कृतिक क्षेत्र, बांबू सेटन, मायावती फॉरेस्ट निरोगी वन वनौपचार केंद्र आदी विभाग असणार आहेत.