चिखलात बसून दिघोडे ग्रामस्थांचे आंदोलन
चिखलात बसून दिघोडे ग्रामस्थांचे आंदोलन
रस्त्याच्या दुर्दशेवर संतप्त प्रतिक्रिया, सार्वजनिक बांधकाम विभागाचे लेखी आश्वासन
उरण, ता. २६ (वार्ताहर) ः अटल सेतू ते दिघोडे फाटा या कोकणात जाणाऱ्या मुख्य मार्गावरील खड्ड्यांमुळे संतप्त झालेल्या दिघोडे गावातील नागरिकांनी चिखलात बसून अनोखे आंदोलन केले.
या मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिक, प्रवासी, विद्यार्थी आणि रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे तातडीने रुंदीकरण व काँक्रीटीकरण करावे, या मागणीसाठी शुक्रवारी (ता. २५) दिघोडे फाट्यावर हे आंदोलन पार पडले. या आंदोलनात गावातील सरपंच कीर्तीनिधी ठाकूर, महिलावर्ग, ग्रामस्थ तसेच प्रवासी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सुमारे दीड तास चिखलातील खड्ड्यांत बसून रस्त्याच्या दुरवस्थेचा निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनामुळे मुंबई व कोकणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्याने काही काळ वाहतूक विस्कळित झाली. या आंदोलनात गावातील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. यामध्ये माजी सरपंच अविनाश पाटील, वर्षकेतू ठाकूर, उपसरपंच संदेश पाटील, काँग्रेस नेते रामनाथ पंडित, प्रेमनाथ म्हात्रे, माजी सरपंच संकिता जोशी, ॲड. निग्रेस पाटील, सुरेश पाटील, रमेश कोळी, अनंत नाखवा, मंदार पाटील, परशुराम पाटील, अलंकार ठाकूर, गोकुळदास माळी तसेच आरती कोळी, रेखा कोळी, महिला व युवावर्ग उपस्थित होता.
.............
प्रशासनाकडून तातडीने दखल
आंदोलनाची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नरेश पवार आणि उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सरपंच कीर्तीनिधी ठाकूर यांना रस्त्यावरील खड्डे तातडीने दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले. या लेखी आश्वासनाच्या आधारे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले, अशी माहिती सरपंच ठाकूर यांनी दिली. तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामस्थ व महिलांचे त्यांनी आभार मानले. या वेळी या रस्त्याचे काम करणाऱ्या ‘एमपीपी खारपाटील’ कंपनीने तातडीने खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले.