राज्यातील ४० हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात,

राज्यातील ४० हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात,

Published on

४० हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात
आधार लिंक नसल्याने अनुदानित शिक्षकांवर होणार परिणाम
संजीव‍ भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः राज्यातील अनुदानित, सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या; परंतु त्यांचे आधार लिंक होऊ न शकलेल्या तब्बल चार लाख २३ हजार ४०८ विद्यार्थ्यांची माहिती समग्र शिक्षा अभियानाने जाहीर केली आहे. या माहितीमुळे सुमारे ४० हजारांहून अधिक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर गेल्या काही वर्षांत अनुदानाच्या विविध टप्प्यांवर आलेल्या शिक्षकांच्या वेतन अनुदानाचाही मोठा प्रश्न यानिमित्ताने समोर येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

समग्र शिक्षा व राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने दिलेल्या माहितीनुसार मागील महिन्याअखेर नोंदविण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यातील शाळांमध्ये नोंदणी झालेल्या दोन कोटी ११ लाख ७९ हजार ६७३ विद्यार्थ्यांपैकी तब्बल चार लाख २३ हजार ४०८ विद्यार्थ्यांचे आधार लिंक होऊ शकले नाही. यामुळे हे विद्यार्थी शाळांमध्ये असले तरी त्यांची नोंद ‘युडास’ आदी प्रणालींमध्ये होणार नसल्याने याचा थेट परिणाम सुमारे ४० हजार शिक्षकांच्या नोकऱ्यांवर होणार असून यात सर्वाधिक शिक्षक अनुदानित शाळांतील असतील, यामुळे विविध टप्प्यांवर आलेले असंख्य शिक्षक पुढील टप्प्यांवर पोहोचण्यापूर्वीच अतिरिक्त ठरण्याची भीती शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. राज्यात सरकारी, अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदणीसोबत त्यांचे आधार लिंक केले जात आहे. आत्तापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९९ टक्के त्याखालोखाल रत्नागिरी, भंडारा ९८ टक्के आणि सातारा, वर्धा, अहिल्यादेवीनगर, गडचिरोली, कोल्हापूर, गोंदिया, सांगली जिल्ह्यात ९७ टक्क्यांहून अधिक तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ९३ ते ९६ टक्क्यांर्यंत आधार लिंक पूर्ण झाले आहेत.

या शिक्षकांना सर्वाधिक धोका
राज्यातील सहा हजार ७५ शाळा आणि नऊ हजार ६३१ तुकड्यांवरील ४९ हजार ५६२ शिक्षकांपैकी असंख्य शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या आधार लिंक नसल्याचा फटका बसू शकतो. यासोबतच नव्याने २० टक्के अनुदानावर पोहोचलेल्या दोन हजार ७२४ शिक्षक आणि शिक्षकेतरही यामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित होऊन ते अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.


आधार लिंक आणि दुरुस्ती केंद्रावर शिक्षकांनाच मुलांसोबत जावे लागत आहेत, वारंवार हेलपाटे घालावे लागतात, आता जन्म दाखल्यावर आई-वडील आधार नोंद करा, अशाही सूचना आहेत. बोटाचे ठसे न जुळणे अशाही तांत्रिक अडचणी आहेत. यातील अनेक बाबी शासन नियंत्रणात असल्याने योग्य पर्याय काढणे गरजेचे आहे.
- महेंद्र गणपुले, शिक्षणतज्ज्ञ
--
काय आहेत अडचणी?
- आधार काढताना जन्मदाखला आवश्यक असतो, तो अनेकदा स्थलांतरित पालकांमुळे मिळत नाही.
- आधार काढताना कार्यरत असलेला मोबाईल नंतर कार्यरत नसल्यास ओटीपीसह मिळण्यात अडचणी
- हाताचे ठसे, डोळे आदी जुळत नाहीत.
- महा ई-सेवा केंद्रावर अनेकदा गर्दी असते.
- आधार नसल्याने मुंबईत सुमारे चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी होऊ शकली नसल्याचा अंदाज
--
या जिल्ह्यात सर्वाधिक आकडेवारी
जिल्हा आधार लिंक नसलेले विद्यार्थी
ठाणे ४३,७६८
पुणे ३२,४४०
मुंबई-२ २८,१६१
मुंबई उपनगर १३,४८६
पालघर २२,५६०
नाशिक २२,५६७
जळगाव १८,५५६
रायगड १७,१२९
सोलापूर १५,४१०
धुळे १४,८०८
छ. संभाजीनगर १४,७७५
नांदेड १४,५१४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com