फॅक्टचेक- परिवहन कार्यालयासमोर टॅक्सी चालकांची मुजोरी

फॅक्टचेक- परिवहन कार्यालयासमोर टॅक्सी चालकांची मुजोरी

Published on

टेस्ट ड्राइव्ह
----
परिवहन कार्यालयापुढेच
टॅक्सीचालकांची मुजोरी
तासाभरात १५ जणांनी नाकारले भाडे
नितीन जगताप ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मुंबईकरांना टॅक्सीचालकांकडून भाडे नाकारण्याचा प्रकार नवा नाही. त्यासंदर्भात तक्रारींसाठी मध्यंतरी परिवहन विभागाने व्हॉट्सॲप क्रमांक दिला होता. पुढे तो रद्द करीत टोलफ्री क्रमांक जारी केला; तरीही भाडे नाकारण्याचा टॅक्सीचालकांचा उद्दामपणा सुरूच आहे. धक्कादायक बाब म्हणजे फोर्ट भागातील परिवहन आयुक्त कार्यालयापुढेच अनेक टॅक्सीचालक क्षुल्लक कारण देत भाडे नाकारत आहेत.
‘सकाळ’च्या प्रतिनिधीने संध्याकाळी पाच ते सहादरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी जायचे असल्याचे सांगत १० ते १५ टॅक्सीचालकांना विचारणा केली. तासाभरात एकही टॅक्सीचालक जायला तयार झाला नाही. लांबचे भाडे सांगूनही टॅक्सीचालकांनी जाण्यास नकार दिला. त्यातील ९० टक्के चालकांनी भाडे नाकारण्याचे कारणही देण्यास नकार दिला. ‘सकाळ’ने परिवहन आयुक्त कार्यालयासमोर केलेला हा रिॲलिटी चेक!
---
स्थळ : परिवहन आयुक्त कार्यालय परिसर
पत्ता : एमटीएनएल इमारत, एम. जी. रोड, फोर्ट
----
टॅक्सी क्रमांक : एमएच ०१ एटी ०१९८
वेळ : ५.२८
प्रतिनिधी : काळाबादेवीला येणार का?
टॅक्सीचालक : नाही, मला आराम करायचा आहे.
----
टॅक्सी क्रमांक : एमएच ०१ बीडी ३२०६
वेळ : ५.३१
प्रतिनिधी : गेट ऑफ इंडियाला जायचे आहे.
टॅक्सीचालक : नाही येणार.
प्रतिनिधी : का?
टॅक्सीचालक : कारण सांगणार नाही.
-----
टॅक्सी क्रमांक : एमएच ०१ सीजे २७०२
वेळ : ५.३४
प्रतिनिधी : सीएसएमटीला चला.
टॅक्सीचालक : नाही येणार (कारण सांगितले नाही).
----
टॅक्सी क्रमांक : एमएच ०१ बीडी २०१६
वेळ : ५.३५
प्रतिनिधी : दादर स्टेशनला येणार का?
टॅक्सीचालक : माझे भाडे ठरलेले आहे. मी नाही येऊ शकत.
---
टॅक्सी क्रमांक : एमएच ०१ सीजे ५३५०
वेळ : ५.४४
प्रतिनिधी : चेंबूर रेल्वेस्थानक येथे जायचे आहे.
टॅक्सीचालक : सीएनजी संपलाय, त्यामुळे येणार नाही.
-------
भाडे नाकारण्याची प्रमुख कारणे
- सीएनजी संपला आहे.
- आराम करायचा आहे.
- आम्ही जेवण करायचे नाही का?
- तिकडे फार वाहतूक कोंडी असते.
- येताना भाडे मिळत नाही, रिकामे यावे लागते.
- जवळचे भाडे घेत नाही.
- मी दुसऱ्या दिशेला जातोय.
- माझे बुकिंग आहे.
- मी घरी जातोय.
- मीटर बंद केले आहे.
-----
टोल फ्री क्रमांकाबाबत अनभिज्ञ
परिवहन विभागाने मुजोर रिक्षा-टॅक्सीचालकांची तक्रार करण्यासाठी १० जूनपासून मुंबई महानगर प्रदेशसाठी टोल फ्री क्रमांक १८००-२२०-११० सुरू केला आहे. मात्र त्याबाबत अनेक प्रवासी अनभिज्ञ असल्याचे निदर्शनास आले.
----
टॅक्सीचालक भाडे नाकारत असेल, तर त्या टॅक्सीचा क्रमांक मला द्या. संबंधित टॅक्सीचालकावर नियमानुसार कारवाई केली जाईल.
- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त
----
प्रवाशांबरोबर गैरवर्तन करणाऱ्या, भाडे नाकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सीचालकांवर वाहतूक पोलिस, परिवहन विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे.
- राजरत्न पवार, प्रवासी
----
टॅक्सी असो वा रिक्षा कित्येक प्रवाशाला भाडे नाकारले जाते; पण तक्रार क्रमांकाबाबत पुरेशी माहिती मिळत नाही. परिवहन विभागाने टोल फ्री क्रमांक ठिकठिकाणी प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
- मनीषा माने, प्रवासी
====
परिवहन विभागाकडून केवळ कागदोपत्री टॅक्सीचालकांविरोधात कारवाई करतो. टॅक्सीचालकांवर कारवाई करण्याऐवजी तडजोड करतात. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांमध्ये धाक उरला नाही. ठोस कारवाई करावी अन्यथा हा प्रकार सुरूच राहील.
के. के. तिवारी, अध्यक्ष, भाजप रिक्षा-टॅक्सी सेल
====
आरटीओनिहाय मुंबईतील टॅक्सीसंख्या
ताडदेव आरटीओ - २६,५४४
वडाळा आरटीओ - ८,२६३
अंधेरी आरटीओ - ६,४१८
बोरिवली आरटीओ - १,६११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com