फलाटावरच मिळणार रेल्वे तिकीट

फलाटावरच मिळणार रेल्वे तिकीट

Published on

फलाटावरच मिळणार रेल्वे तिकीट
नागपूरमध्ये प्रयोग यशस्वी; तिकिटांसाठी रांगा आता होणार इतिहासजमा
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : रेल्वे तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास आता संपणार आहे. रेल्वे प्रशासनाने ऐतिहासिक पाऊल उचलत प्रवासादरम्यानच तिकीट तपासनीसाकडून (टीटीई) थेट जनरल तिकीट मिळण्याची सुविधा लवकरच देशभर उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर याचा पहिला प्रयोग करण्यात आला, तो यशस्वी ठरला आहे.

रेल्वेस्थानकांच्या तिकीट खिडकीवर सामान्य तिकिटासाठी रांगा लागतात; मात्र हे चित्र आता बदलणार आहे. ‘ताजुद्दीन बाबा उर्स’सारख्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर नागपूर स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा राबवली गेली. यात पाच तिकीट तपासनीसांनी मिळून तब्बल ५,५०० हून अधिक तिकिटांची विक्री केली. त्यामुळे नागपूरचा हा प्रयोग देशभरात राबवण्यात येणार असल्याची माहिती ‘सकाळ’ला मिळाली आहे. ‘एम-यूटीएस’ (मोबाईल अनरिझर्व्ह तिकीट सिस्टीम) या प्रणालीच्या माध्यमातून टीटीईकडे असलेल्या विशेष यंत्राद्वारे प्रवाशांना प्रवासादरम्यानच अधिकृत जनरल तिकीट मिळणार आहे. त्यामुळे तिकीट खिडकीपुढील गर्दी, वेळ आणि गैरसोयींना लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. त्यातच यामुळे अनधिकृत प्रवाशांत घट होऊन तिकीट प्रक्रियेत पारदर्शकता येईल.

कसे देणार तिकीट?
‘टीटीई’कडे बेस्टच्या वाहकाप्रमाणे एक छोटे हँडहेल्ड यंत्र असेल, ज्याद्वारे तो प्रवाशाला तत्काळ जनरल तिकीट प्रिंट करून देऊ शकेल. ही सेवा केवळ मोठ्या रेल्वेस्थानकांपुरती मर्यादित नसून, अगदी छोट्या स्थानकावरही लागू होणार आहे. त्यामुळे छोट्या गावांतील प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. रेल्वे बोर्डाने संपूर्ण देशभरात ही योजना टप्प्याटप्प्याने राबवण्याचा निर्णय घेतला असून, मार्च २०२६ पर्यंत सर्व विभागांमध्ये हे उपकरण टीटीईंना उपलब्ध होणार आहे.


अनारक्षित तिकिटांची आकडेवारी
आर्थिक वर्ष तिकीट विक्री प्रति दिवस
२०२२-२३ ५५३  कोटी १.५२ कोटी
२०२३-२४   ६०९ कोटी १.६७ कोटी
२०२४-२५ ६५१ कोटी १.७८ कोटी

तिकीट तपासनीसांसाठी खास यंत्र
‘एम-यूटीएस’ म्हटल्यावर मोबाइल अ‍ॅपचा भ्रम होऊ शकतो; मात्र ही सेवा प्रवाशांसाठी नसून टीटीईसाठी खास डिव्हाईस स्वरूपात आहे. यामध्ये रेल्वे नेटवर्कशी थेट जोडलेली प्रणाली असून, प्रवाशाचे नाव, गाडी क्रमांक, स्टेशन, प्रवासाचा दिनांक आणि भाडे हे सर्व तपशील त्या तिकिटावर असतात.


संपूर्ण देशभरात अंमलबजावणी
रेल्वे बोर्डाने देशभरातील सर्व विभागांना ही प्रणाली वापरण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम, मध्य, दक्षिण, उत्तर व पूर्व रेल्वे विभागांमध्ये याचा अंमल सुरू असून, लवकरच मुंबई, पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातही ही सेवा सुरू होणार आहे.


नागपूरमध्ये नुकताच ‘एम-यूटीएस’ यंत्रणांचा वापर करण्यात आला. प्रवाशांकडून याला उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रणालीमुळे व्यवस्थापन प्रभावी होईल, प्रक्रिया पारदर्शक राहील आणि प्रवास अधिक कायदेशीर व सुलभ बनेल. यामुळे रेल्वेवर प्रवाशांचा विश्वास अधिकच दृढ होईल.
- डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com