५०० लोकसंख्येसाठी एकच शौचालय!
मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. २७ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात ‘अ’ दर्जाची नगरपालिका असूनही छत्रपती शिवाजी महाराज नगर वसाहतीतील पाचशेहून अधिक लोकसंख्येला केवळ एकाच सार्वजनिक शौचालयावर अवलंबून राहावे लागत आहे. यात पुरुष व महिलांना केवळ दोनच शौचालये होती; मात्र एकाचे दुरवस्था झाल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहे. धक्कादायक म्हणजे शौचालयांची सफाई करण्यासाठी पालिकेची कर्मचारीच येत नसल्याचे समोर आले. १० ते १५ वर्षांपासून स्थानिक रहिवासी खासगी व्यक्तींकडून सफाई करत आहेत. शौचालयाची सफाई करण्यासाठी ठेकेदार नेमला असताना, मग पालिकेचे पैसे जातात कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या वसाहतीत सुमारे १००हून अधिक घरे असून, जवळपास ५०० लोकसंख्या आहे. २० वर्षांहून अधिक काळापासून या वस्तीमध्ये नागरिक राहत आहेत. माजी नगरसेवकाच्या प्रयत्नातून या ठिकाणी दोन सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. त्यातच एका शौचालयाचे भांडे फुटल्याने, तोही वापरात नसल्यामुळे फक्त एकाच शौचालयात महिला आणि पुरुषांना जावे लागते. यात महिलांची मोठी कुचंबना होत असल्याची प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली आहे. शिवाय, सकाळच्या वेळेत प्रात:विधीसाठी या ठिकाणी रांगाच्या रांगा लागतात. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी किमान चार शौचालयांची आवश्यकता आहे. जेणेकरून दोन शौचालय पुरुष आणि दोन महिलांना वापरता येतील, अशी अपेक्षा रहिवासी व्यक्त करत आहेत.
खासगी व्यक्तीकडून स्वच्छता
मुख्य म्हणजे शौचालयांची सफाई करण्यासाठी पालिकेचा कोणताही कर्मचारी येत नाही. त्यामुळे, १० ते १५ वर्षांपासून येथील रहिवासी दरमहा ४० ते ५० रुपये प्रत्येक घरामागे काढून, खासगी व्यक्तींकडून शौचालयाची सफाई करून घेत आहेत आणि याच पैशातून दुरुस्ती आणि देखभालीचा खर्चही केला जातो.
पालिकेचा सफाई ठेकेदार कुठे?
पालिकेने या ठिकाणी सफाईसाठी ठेकेदार नेमला आहे, असे नागरिक सांगतात. जर ठेकेदार आहे तर पालिकेकडून शौचालयाच्या सफाईसाठी येणारे पैसे जातात कुठे, असा प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत. अ वर्ग दर्जाच्या बदलापूर नगरपालिकेत कर भरणाऱ्या महिला आणि पुरुषांना एकाच शौचालयात जाण्याची वेळ येत असल्याने पालिकेवर सर्व स्तरातून टीका होत आहेत.
लोकवर्गणीतून शौचालय उभारण्याची वेळ
झोपडपट्टीवजा घरातील पुरुष मजुरी करतात, तर महिला घरकाम करतात. आम्ही नियमित कर भरतो, तर दैनंदिन पायाभूत सुविधांसाठी दाद मागायची कोणाकडे? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. आम्हाला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन उदासीन आहे. आता लोकवर्गणीतून सार्वजनिक शौचालय उभारावे लागतील, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते संजय वानखेडे यांनी दिली.
एकच शौचालय असल्याने पुरुष आणि महिलांना प्रात:विधीसाठी गेल्यावर रांगा लावाव्या लागतात. त्यामुळे अनेकदा लाजल्यासारखे होते; पण आमची तक्रार सांगायची कोणाकडे?. दुसरीकडे या शौचालयाबाहेर दिवे नसल्याने रात्रीच्या वेळेत महिलांना भीती वाटत असते.
- लीला चव्हाण, रहिवासी
आमच्या वस्तीत कधीच साफसफाई होत नाही. त्यात सार्वजनिक शौचालयही एकच आहे. पर्याय नसल्याने मोठी गैरसोय होते. कोणाला पोट खराब झाले असेल, तर मोठी पंचायत होते. आम्ही पालिकेचा नियमित कर भरतो. मात्र सुविधा मिळत नाही. गटारेही उघडी पडलेली आहेत, ती बांधून द्यावीत. तसेच, परिसरात किमान चार शौचालये तरी पालिकेने बांधून द्यायला हवी.
- लता ढोकळे, रहिवासी
या ठिकाणी असलेले दोन शौचालये पालिकेने बांधलेले नाहीत. येथील माजी नगरसेवकाने स्वखर्चातून बांधून दिलेले आहेत. त्यामुळे स्वच्छतेसाठी पालिकेचा कोणताही ठेकेदार नेमण्यात आलेला नाही. मात्र, एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी पालिकेकडून शौचालय बांधण्यासाठी या परिसराची पाहणी करून आढावा घेतला जाईल. तसेच, सार्वजनिक शौचालयाची उपलब्धता पालिकेच्या माध्यमातून करून दिली जाईल. लवकरच लोकहिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात येईल. महिला वर्गाला कोणताही त्रास होणार नाही त्या संदर्भात पालिका प्रशासन काम करेल.
- मारुती गायकवाड, मुख्याधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.