मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच बालमृत्यूंचे प्रमाण अधिक
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच बालमृत्यूंचे प्रमाण अधिक
ग्रामीण भागापेक्षा मुंबईत बालमृत्यूची भयावह स्थिती
मुंबई, ता. २६ : बालमृत्यू रोखण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्चाच्या विविध योजना राबविल्या जात असताना पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांत गेल्या तीन वर्षांत शून्य ते पाच वर्षांतील तब्बल ४९ हजार ८० बालमृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक संख्या नागपूरमध्ये चार हजार २१८ आणि त्याखालोखाल मुंबईत चार हजार १३४ बालमृत्यू झाले आहेत.
मुंबईसारख्या जागतिक शहरामध्ये ग्रामीण भागापेक्षा कुपोषण, आरोग्यासंदर्भात प्रचंड मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध असतानाही बालमृत्यू रोखण्यात आरोग्य यंत्रणेला अपयश आले आहे. यावरून मुंबईतील बालमृत्यूंची स्थिती भयावह असल्याचे दिसून आले. याच कालावधीत बालमृत्यूंसोबत दुसरीकडे मातामृत्यूंचेही प्रमाण तीन हजार ७८६ इतके असून, मुंबईत राज्यातील सर्वाधिक ५७० इतके मातामृत्यू झाले आहेत. त्याखालोखाल नागपूरमध्ये ४०९ आणि पुण्यात ३७४ इतक्या मातांचे मृत्यू झाले असल्याची माहिती आरोग्य सेवा कुटुंब कल्याण माता बाल संगोपन शालेय आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. जानेवारी २०२२ ते २२ जुलै २०२५ या कालावधीतील ही बालमृत्यूंची आकडेवारी आहे. तर माता मृत्यूंची १ जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२५ या कालावधीतील माहिती असून, ती माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना विभागाकडून माहिती अधिकारात देण्यात आली आहे.
उपजत मृत्यूंमध्ये पुण्यात सर्वाधिक संख्या
राज्यात या कालावधीत उपजत मृत्यूंचे प्रमाणही तब्बल ४२ हजार ३८४ इतके आहे. मुंबईसारख्या शहरात बालमृत्यूंसोबत उपजत मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याचेही दिसून आले आहे. मागील तीन वर्षांत एकट्या मुंबईत चार हजार ३२० उपजत मुलांचे मृत्यू झाले आहेत. पुण्यात ही संख्या चार हजार ३५४ इतकी असून, ती राज्यात सर्वाधिक आहे. तर नागपुरात एक हजार ४७२ इतकी उपजत मृत्यूंची संख्या आहे.
--
बालमृत्यू (जानेवारी २०२२ ते २२ जुलै २०२५ )
जिल्हा संख्या
अकोला २,२६२
अमरावती २,१३७
यवतमाळ ९०१
छ. संभाजीनगर १,५५६
मुंबई ४,१३४
नागपूर ४,२१८
पुणे २,९२८
राज्य एकूण ४९,०८०
माता मृत्यूंचे प्रमाण (जानेवारी २०२२ ते ३१ एप्रिल २०२५)
जिल्हा संख्या
मुंबई ५७०
पुणे ३७५
छ. संभाजीनगर २०३
नागपूर ४०९
अमरावती ११८
अकोला ७६
यवतमाळ ९२
राज्य एकूण १,८४८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.