दुकान, हाॅटेल्सना मराठी पाट्या बंधनकारक
दुकान, हाॅटेलांना मराठी पाट्या बंधनकारक
पालघर, ता. २६ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार दुकाने, हॉटेल आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना त्यांची नावे देवनागरी लिपीतील मराठी भाषेत प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी पालघर जिल्ह्यात कामगार उप आयुक्तांच्या निर्देशानुसार शुक्रवारी (ता. २५) विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत विविध हॉटेल, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांना भेटी देऊन त्यांच्या नामफलकांची तपासणी करण्यात आली. ज्या ६५ आस्थापनांनी मराठी नामफलक लावले नव्हते. त्यांना तत्काळ दुरुस्ती करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असून, पालघर जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी त्वरित देवनागरी लिपीतील मराठी भाषेत नामफलक लावण्याचे आवाहन कामगार उप आयुक्तांनी केले आहे.