नागपंचमी आली, पण सापांचे दर्शन दुर्लभ झाले
ठाण्यात सापांचे दर्शन दुर्लभ
शहरीकरणामुळे नैसर्गिक अधिवास संकटात; पर्यावरणतज्ज्ञांकडून खंत
ठाणे शहर, ता. २७ (बातमीदार) : कधीकाळी नागपंचमी म्हणजे प्रत्यक्ष सर्पदर्शनाचा सण मानला जात असे. अंगण, मंदिर परिसर, झाडाझुडपांमध्ये सापाच्या दर्शनासाठी लोक वाट पाहात असत. नागपंचमीचा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे; मात्र सापच दिसत नाहीत. प्लॅस्टिकचे नाग, रंगीत स्टिकर्स, मातीची मूर्ती आणि मंदिरातील पूजा एवढ्यावरच हा सण मर्यादित राहिलेला दिसतो.
ठाणे जिल्ह्यातील गावपाडे झपाट्याने विकसित होत आहेत. गल्लीबोळातल्या रस्त्यांवर सिमेंट काँक्रीट टाकले जात आहे. त्यामुळे सापांचा नैसर्गिक अधिवास संकटात येत असून, त्या परिसरातील त्याच्या अस्तित्वाला बाधा पोहोचत आहे. झुडपी जागा, माळराने, तलावाच्या किनारीची दलदल, ओसाड बांध आदी ठिकाणच्या अधिवासांवर गदा येत आहे. सर्पमित्र नीलेश सुतार यांच्या मते पूर्वी एका पावसाळ्यात ठाण्यात १५० ते २०० सर्प रेस्क्यू करायचो, आता ती संख्या एकदम कमी झाली आहे. कारण सापच उरलेले नाहीत.
निसर्ग शास्त्रज्ञांच्या मते सर्प अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहेत. ते उंदीर, बेडूक, सरडे यांसारख्या पीकनाशक जीवांवर नियंत्रण ठेवतात. साप नसल्याने उंदरांच्या संख्येत वाढ झाली असून, शेती आणि बियाणांचे नुकसान वाढले आहे. कृषी विद्यापीठांच्या अहवालानुसार सर्पांची संख्या ज्या भागांत घटली आहे, तिथे कृषी क्षेत्रात नकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
पर्यावरण कार्यकर्त्या संपदा टेंबे यांचे म्हणणे आहे, “आपण नागाची पूजा करतो, पण त्याचे रक्षण करत नाही. हे श्रद्धेचे नाही, तर दुजाभावाचे लक्षण आहे.” नागपंचमीच्या दिवशी मंदिरात पूजा केली जाते, पण दुसऱ्या दिवशी घरात साप आढळल्यास त्याला मारण्यासाठी सर्पमित्रांना फोन केला जातो, हे पर्यावरणीय विडंबनच आहे.
ठाण्यातील ज्येष्ठ सर्पतज्ज्ञ अनिल कुबल सांगतात, “साप माणसावर सहज हल्ला करत नाही. त्याच्या प्रत्येक हालचाली म्हणजे फक्त बचावाचा इशारा असतो. आपण त्याचा अधिवास नष्ट केला आणि तो शहरात शिरला की त्याला मारून टाकतो. नागपंचमीला पूजा करताना या जीवाला जगू द्यावे, ही संकल्पना पसरवली पाहिजे. साप वाचला तर निसर्ग वाचण्यास मदत होईल.”
सध्या नागपंचमीचा सण मातीच्या किंवा प्लॅस्टिकच्या नागांच्या पूजेमध्ये अडकलेला आहे. प्रत्यक्ष साप, त्याचे संरक्षण, अधिवासाचे पुनरुज्जीवन हे मुद्दे या उत्सवाच्या केंद्रस्थानी यायला हवेत, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.
ठाणे-मुंबई परिसरात आढळणारे साप :
बिनविषारी: धामण, दिवड, गवत्या, रुकई, कुकरी
निमविषारी: मांजऱ्या, हरणटोळ
विषारी: नाग, घोणस, मण्यार, फुरसे
काय उपाय करावेत?
जैवविविधतेसाठी राखीव क्षेत्र राखणे
सर्पमित्र संघटनांना पाठबळ
जनजागृती आणि शालेय प्रशिक्षण
कायद्याची साप मारणे हा गुन्हा आहे.
नागपंचमीसारख्या सणांना निसर्गसंवर्धनाशी जोडले जावे.
MUM२५E९९७७५
MUM२५E९९७७६
MUM२५E९९७७७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.