विरार मध्ये महिलांचा घागर घुमूदे चा आवज
विरारमध्ये महिलांचा ‘घागर घुमू दे’चा आवाज
यंग स्टार ट्रस्टच्या मंगळागौर स्पर्धेला मोठा प्रतिसाद ः ४० संघांचा सहभाग
विरार, ता. २७ (बातमीदार) ः घागर घुमू दे, दिंड्या मोड ग पोरी असेल, अशा गाण्यावर नवविवाहित बरोबरच इतर महिलांनीही ताल धरलेला असतानाच मध्येच रुणूझुणू त्या पाखरा जा रे माझ्या माहेरी म्हणत नवविवाहित तरुणी आपोआप आपली पावले टाकत नाचत मंगळागौर सादर करत होत्या. विरारमध्ये स्टार्स ट्रस्ट अध्यक्ष व माजी आमदार हितेंद्र ठाकूर आयोजित मंगळागौर स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत ऐरोली, कांदिवली, मालाड, ठाणे, खोपोली, वसई, विरार येथील जवळपास ४० महिलांच्या संघाने सहभाग घेतला होता.
यंग स्टार ट्रस्ट समन्वयक अजीव पाटील यांच्या समन्वयातून कै. विद्या दयानंद पाटील व कै. भारती प्रदीप देशमुख यांचे स्मृतिप्रीत्यर्थ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. नवविवाहित, महिला नववारी लुगडे, नाकात नथ व पारंपारिक दागिने घालून आल्या होत्या. नाच... गं घुमा, फु बाई फु फुगडी, आगोटा पागोटा, गाठोड, कोंबडा, घागर घुमू दे अशा पारंपरिक गाण्यासह सासू-सुनेच भांडणं, लाट्या बाई लाट्या, अडवळ घुम पडवळ घुम, आगोटा पिगोटा, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी असे वेगवेगळे प्रकार सादर करण्यात आले आणि उपस्थित रसिक त्याला मनमुराद दाद देत होते. मंगळागौर स्पर्धेचे हे एकविसावे वर्ष होते. या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून जयेश पाटील आणि दीपाली धवणे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील, प्रशांत राऊत, उत्कर्ष विद्यालयाच्या प्राचार्या मुग्धा लेले, माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे, मिलिंद पवार, मिलिंद पोंक्षे यांच्या उपस्थितीत झाले.