विकासासाठी पर्यावरण वेठीस
पनवेल, ता. २७ (बातमीदार)ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे वाहनांची संख्या वाढती आहे. या वाहनांमुळे उद्भवणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कळंबोली सर्कलचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ६९२ झाडे बाधित होणार असल्याने पुनर्रोपणासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. पण या निर्णयामुळे महामार्गालगतची हिरवाई संपुष्टात येणार असल्याने विकासासाठी पर्यावरणाचा बळी दिला जाण्याची शक्यता अधिक आहे.
कळंबोली जंक्शन येथे विविध मार्ग एकत्र येतात. दक्षिण तसेच उत्तरेकडील राज्याकडे जाणारी-येणारी वाहने येतात. त्याचबरोबर मुंबई तसेच पुणे आणि जेएनपीटीकडे जाणारा महामार्ग असल्याने वाहनांची ये-जा सुरू असते. येथील कोंडी फोडण्यासाठी सर्कलच्या अद्ययावतीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता ७७०.४९ कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी कळंबोली जंक्शनचे विस्तारीकरण होणार आहे. पण यासाठी ७ ते ६० वर्षांपर्यंतचे ६९२ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. पण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची वनराई संपुष्टात येणार आहे.
-----------------------------------------------
विस्तारीकरणाचे टप्पे -
- माती परीक्षणाचे काम पूर्ण
- दोनमजली रस्ते तयार
- लांबी १५.५३ किलोमीटर
- पूर्णपणे सिग्नलरहित मार्ग
- वाहतूक कोंडी टळणार
----------------------------
पुनर्रोपणाबाबत साशंकता
कळंबोली जंक्शन विस्तारीकरणासाठी ६९२ झाडांचा अडथळा ठरत आहे. एमएसआरटीसीने यातील ६९० वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त दोन झाडांची तोड करण्याचा प्रस्ताव पालिकेकडे सादर केला आहे. पण बहुतांश झाडे १० ते ३५ वर्षांची असल्याने पुनर्रोपणानंतर त्यांचे अस्तित्व टिकेल, याची खात्री पर्यावरणतज्ज्ञांना नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
-----------------------------------
७२५ झाडांना अभय
प्रकल्पाच्या सुरुवातीला १,४०५ झाडे बाधित होणार होती. त्यापैकी ७१३ वृक्ष वाचविण्यात आले असल्याचा दावा कार्यकारी अभियंता दीपक हिंगे यांनी केला आहे. तसेच पुनर्रोपण होणाऱ्या झाडांचे संवर्धन खासगी कंपनीमार्फत केले जाणार आहे.
-----------------------------------
झाडांचे पुनर्रोपण होणारे मार्ग
- स्टीलयार्ड रोड पुणे ते पनवेल जेएनपीटीकडे जाणारा रस्ता
- शिळफाटा रोड ते स्टीलयार्ड रोड
- मॅक्डोनल्ड रोड ते कळंबोली सर्कल
- जेएनपीटी रोड ते एमजीएम रोड
----------------------------
ही वृक्षसंपदा धोक्यात
विलायती चिंच, पिंपळ, सुबाभूळ, सप्तपर्णी, बदाम, रेन ट्री, वड, उंबर, गुलमोहोर, सोनमोहोर, जांभूळ, नारळ, अशोका, करंज, बाभूळ, आंबा, बोर, नीलगिरी, शेवगा, चेरी, एडन, अर्जुन, आसन, बकूळ, बेल, भेंडी, चाफा, धामन, सोनेरी, कदंब, खैर, मोह, निंब, फणस, रामफळ, रॉयल पाम, सीताफळ, जंगली, बॉटल पाम, जंगली उंबर, कांचन, पेरू, पाइन ट्रीचे पुनर्रोपण आवश्यक आहे.
------------------------------------
कळंबोली सर्कलचे अद्ययावतीकरण विकासाच्या दृष्टिकोनातून योग्य असले तरी शेकडो झाडांची तोड करावी लागणार आहे. या झाडांच्या पुनर्रोपणाचा दावा केला जात असला तरी संवर्धन आणि संगोपन याबाबत शासन साशंकात आहे.
- धनंजय पाटील, पर्यावरणप्रेमी, पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.